द्राक्षे ओढ्यात टाकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ! हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला
अवकाळीने शेतकऱ्यांचे कष्ट वाया
सावळज/वार्ताहर
अवकाळी पावसाने तासगाव पुर्व भागातील अनेकांच्या द्राक्षबागेत घडकुजी, मणीगळ होऊन नुकसान होवुन द्राक्ष शेती उध्वस्त झाली आहे. मात्र आस्मानी संकटामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने जिवापाड जपलेली द्राक्षे ओढ्यात टाकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील खुजगाव (ता. तासगाव) येथील शेतकरी महेश सुभाष पाटील यांच्या द्राक्षबागेत अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिपक्व घडातील मण्यांना तडे जाऊन संपूर्ण बाग सडल्याने हा खराब द्राक्षमाल तोडुन ओढ्यात टाकण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यावर आली. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास आस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महेश पाटील यांची खुजगावमध्ये सात एकर द्राक्षबाग आहे. यापैकी एक एकर दहा गुंठे सोनाक्का वाणाची द्राक्ष बाग आहे. २८
ऑगस्ट रोजी याची आगाप पिकछाटणी घेतली होती. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी माल चांगला होवुन चार हजार पेटी उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती. काही दिवसांमध्ये त्याची विक्री होऊन चांगला दर ही मिळाला असता. मात्र अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने जड अंतःकरणाने द्राक्षे ओढ्यात फेकून द्यावी लागली.
पावसाच्या तडाख्याने मणी क्रॅकिंग झाल्यामुळे संपूर्ण माल सडुन खराब झाला. खराब द्राक्षमालामुळे बागेत दुर्गंधी येण्यास सुरवात झाली होती. खराब झालेला माल बागेत ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे ४० मजूर आणि दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने द्राक्षमाल काढून ओढ्यात टाकावा लागला. जवळपास १० टन माल फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे उत्पादन खर्चासह सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिवापाड जपलेले द्राक्ष पिक २९ व ३० नोव्हेंबर रोजीच्या पावसाने डोळ्यासमोर सडून चालल्याने शेतकरीच उद्ध्वस्त झाला आहे.
अवकाळी पाऊस पडल्यामुळे माझी सव्वा एकर द्राक्षबाग बाधीत झाली. बाजारामध्ये विक्रीसाठी तयार असलेला माल मणी कॅकिंगमुळे वाया गेला. सुमारे १० लाख रुपयांचे माझे नुकसान झाले आहे. काढलेले कर्ज कसे फेडायचे, याची चिंता आहे. यापुढील काळात बागा सांभाळायच्या कशा हा प्रश्न पडला आहे.
- महेश पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी