Sangli : जागा खरेदी- विक्रीसाठी अमेरिकेतील महिलेची 48 लाखांची फसवणूक
चौघांवर फसवणुकीचा गुन्हा : एकास अटक
पलूस प्रतिनिधी
पलूस येथे मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन देतो व सदरची जागा विक्री करून भविष्यात पंधरा ते वीस कोटींचा नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून जागेची बनावट कागदपत्रे तयार करून चौघांनी अमेरिकास्थित असणाऱ्या व सातारा जिल्ह्यातील एका महिलेची सुमारे अठ्ठेचाळीस लाखांची फसवणूक केली. याबाबत सदर महिलेने पलूस पोलीसात फिर्याद दिली असून याप्रकरणी पलूस पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सुलोचना शिवाजीराव भोसले (69, रा. अमेरिका, भारतातील पत्ता नागझरी ता. कोरेगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दत्तात्रय भगवान वडर (रा. नेहरूनगर जुना कुपवाड रोड सांगली) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कृष्णराव तातोबा धोत्रे-पलूसकर (रा. मांजरी बुद्रुक हडपसर पुणे), भारती शंकर माने व शंकर यल्लापा माने, अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सुलोचना भोसले यांना संशयित आरोपी चौघांनी विश्वासात घेतले. पलूस येथे मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. ती खरेदी करून तुम्हाला देतो व तीच जागा पुन्हा विक्री करून त्याचा फायदा तुम्हास करून देतो असे अमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम वसुल केली. हा प्रकार सन जून 2021 मे 2023 या कालावधीत घडला आहे. आरोपी यांनी जागेची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली व त्यावर सुलोचना भोसले यांच्या सह्या घेतल्या. त्यापोटी भोसले यांच्याकडून बँकेच्या मार्फत व रोख स्वरूपात अशी एकूण 48 लाख रूपये रक्कम आरोपी यांनी घेतली. भोसले यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. 17 ऑक्टोबर रोजी संशयित चौघांच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पलूस पोलीस करीत आहेत.