सांगलीत भर रस्त्यात पेटली दुचाकी...इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
क्षणार्धात इलेक्ट्रिक वाहन जळून खाक
सांगली प्रतिनिधी
सांगली माधवनगर रस्त्यावर एक अज्ञात वाहन चालक इलेक्ट्रिक वाहन चालवत दुर्गामाता मंदिर परिसरातून जात असताना वाहनाने अचानक पेट घेतला. चालक गाडी सोडून बाजूला होताच काही समजायच्या आत हे इलेक्ट्रिक वाहन जळून खाक झाले. त्यामुळे या प्रकारच्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यातील काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या भागातून इलेक्ट्रिक वाहने पेट घेतल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून आले होते. सध्या वातावरण पावसाळी असताना आणि हवेत गारवा असताना शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गर्दी असणाऱ्या या परिसरात वाहनाने पेट घेतला आणि परिसरात गोंधळ उडाला. काही नागरिकांनी वर्दी दिल्यानंतर सांगली महापालिकेच्या जवळच असलेल्या टिंबर एरिया विभागातील अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावले आणि त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणले मात्र तोपर्यंत गाडीचा बराचसा भाग जळाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.