Sangli Band Fraud : जिल्हा बँकेच्या बाज शाखेत 30 लाखांचा अपहार! शाखाधिकारीच सामील
शासकीय निधीवर डल्ला, तब्बल आठ वर्षानंतर अपहार चव्हाट्यावर
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी आणि लिपीकडून शासकीय निधातील सुमारे 30 लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेवून शाखाधिकारी संदीप सोलनकर आणि शिपाई कोंडीबा खरात यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
या दोघांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. चौकशीअंती अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दोघेही सध्या डफळापूर शाखेत कार्यरत आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील 30 लाख रक्कम या देघांनी बँकेच्या खात्यावरून स्वत: आणि इतर नातेवाईकांच्या नावे टाकून अपहार केल्याचे तपासणीमध्ये आढळून आले.
याबाबतची चौकशी सुरू आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जत तालुक्यात तळ ठोकून आहे. त्यांनी बाज शाखेची तपासणी केली. अपहारातील नियुक्तीस असलेल्या डफळापूर शाखेचीही तपासणी केली जाणार आहे.
तब्बल आठ वर्षानंतर अपहार उघडकीस
जिल्हा बँकेच्या वर्षभरातील व्यवहाराची चौकशी बँकेकडून वारंवार केली जाते. बँकेचे त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडीट होते. अधिकाऱ्यांकडूनही अतंर्गत तपासणी होते. याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडूनही चौकशी होते. इतक्या चौकशा होत असतानाही बँकेत लाखोचे घोटाळे होत आहेत.
तपासणीमध्ये घोटाळे कसे उघडकीस येत नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या तपासण्यांवर वर्षाला कोट्यावधीचा खर्च होत असून हा सर्व खर्च पाण्यात जात आहे. या दोघांनी 2017 साली हा अपहार केला असून तब्ब्बल आठ वर्षांनी हा अपहार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलनकरांचा वादग्रस्त इतिहास
संदीप सोलनकर यांचे वडील बँकेचे कर्मचारी होते. संदीप शिपाई म्हणून नोकरीला लागले. ते शाखाधिकारी झाले. मात्र त्यांचा कारभार सतत वादग्रस्तच राहिला आहे. दोन वर्षापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची आदेश डावलून त्याने ऑनड्युटी गोवा दौरा केला होता.
बँकेने त्यांच्यावर कडक कारवाई करत जत तालुक्यातील उमदी येथे बदली केली होती. राजकीय दबावाने बदली थांबवून पुन्हा डफळापूर येथे नियुक्ती मिळविली होती. घरबांधणीसाठी बोगस कर्ज प्रकरण करून पैसे हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. मात्र त्यावेळीही त्यांना कारवाईपासून वाचविण्यात आले होते.
राजकीय हस्तक्षेप बँकेच्या मुळावर
जिल्हा बँकेच्या विविध शाखांत आत्तापर्यंत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडूनच अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अपहाराची रक्कमही वसुल केली आहे अस असले तरी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपहाराचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. याला प्रमुख कारण राजकीय हस्तक्षेप हेच आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास त्याला संरक्षण देण्यासाठी संचालकांसह राजकीय नेते सरसावत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना भिती राहिली नाही. जत तालुक्यातील बेळुंडगी शाखेत अरूण वाघमारे या शाखाधिकाऱ्याने बँकेच्या परस्पर एका महिलेची शिपाई पदावर नियुक्ती केली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने वाघमारे यांना शाखाधिकारी पदावरून पायउतार करुन उटगी येथे लिपीक पदावर नियुक्ती केली होती. मात्र राजकीय दबवातून पुन्हा त्यांना शाखाधिकारी पदच देवून उटगी शाखेत बदली केली आहे. बँकेत राजकीय दबाव असल्यानेच कर्मचारी मोकाट सुटल्याने अपहाराचे प्रकार वारंवार घडत आहेत. याकडे बँकेच्या पदाधिकारी आणि एमडी यांनी गांभिर्याने बघण्याची गरज व्यक्त होत आहे.
चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित : शिवाजीराव वाघ
जिल्हा बँकेच्या बाज शाखेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेने चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित होईल, त्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.