ताकारीतील दोन ठकांचा लोकांना ४ कोटींना गंडा ! लोकांच्या नावावर काढली
रोख व कर्जाऊ स्वरुपात फसवणूक; बँका व फायनान्स कंपनीची कर्जे लोकांच्या नावावर काढली : कर्जे थकवली
इस्लामपूर प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील सुशांत माणिकराव कोळेकर(28) यांना अन्य लोकांना किराणा व्यापारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून रोख व कर्जाऊ स्वरुपात 4 कोटी 3 लाख रुपये घेवून दोघांनी फसवणूक केली. ही घटना सन 2022 ते दि. 3 एप्रिल 2024 या कालावधीत घडली.
इरफान तय्यबू मोटलानी, तय्यबू मोटलानी (रा. ताकारी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संगनमत करुन कोळेकर यांना किराणा व्यापारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा होतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी कोळेकर यांच्या नावे एस. के. ट्रेडर्स कंपनी सुरु केली. वेलदोडे व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दोघांनी कोळेकर यांच्याकडून रोख 15 लाख 90 हजार रुपये घेतले. तसेच इरफान याने विश्वास निर्माण करुन कोळेकर यांच्या नावे बजाज फायनान्स काढून आरटीजीएस व्दारे कर्जाऊ रक्कम स्वत:च्या खात्यावर घेवून त्यातील 20 लाख रुपये थकीत ठेवले.
या दोनही आरोपींनी कोळेकर यांना पैशाची गरज असल्याचे सांगत त्यांच्याकडील मालावरती कोळेकर यांच्याच नावाने माल तारण कर्ज काढून स्वत: फेडत असल्याचे सांगत विश्वासाने कर्ज प्रकरणावरती सह्या घेतल्या. त्यांच्या नावे सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूर येथून मोहरी या मालावर दि. 30 जून 2023 रोजी 12 लाख रुपये, माल तारण कर्ज, जिरावर दि. 5 मार्च साडे सात लाख रुपये मंजूर करुन घेतले. तसेच आयडीबीआय बँक शाखा तळसंदे येथून जिरावर दि. 13 मार्च 2024 रोजी 45 लाख रुपये मंजूर करुन घेवून तीनही कर्ज प्रकरणातील मंजूर रक्कम कोळेकर यांच्या खात्यावरुन आरटीजीएस मार्फत आरोपींनी स्वत:च्या खात्यावर घेतले.
अशा पध्दतीने रोख व कर्जाऊ स्वरुपात कोळेकर यांची 82 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच इतर लोकांच्या नावे माल तारण कर्ज मंजूर करुन घेवून कर्जाऊ रक्कम 2 कोटी 21 लाख 34 हजार व व्यापारा कर्ता लोकांकडून 99 लाख 66 हजार 47 रुपये स्वीकारले. या दोघांनी कोळेकर यांच्यासह अनेक लोकांना 4 कोटी 3 लाख 40 हजार 47 रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी कोळेकर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
फोन, घर बंद
ताकारी परिसरातील लोकांनी मोटलानी यांच्यावर चांगलाच विश्वास टाकला. लोकांना या महिन्यांपर्यंत त्यांच्यावर उचापतींचा कसलाच अंदाज आला नाही, त्यामुळे त्यांच्या फसवणुकीच्या उचापती वाढत गेल्या. अलिकडे आरोपी मोटलानी यांचा फोन बंद असल्याने आणि घराला कुलूप असल्याने फसल्याचे लक्षात आले, त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली.