हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून २ कुटुंबात जोरात मारामारी! परस्परविरोधी तक्रारी दाखल
परस्परविरूध्द फिर्याद दाखल : शिवीगाळ केल्याचे कारण
सांगली प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारमारी झाली आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाकडून परस्परविरूध्द फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिली फिर्याद जखमी श्रीनिवास वसंत चव्हाण वय 34 रा. संभाजी चौक, हरिपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण याच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल आहे. तर दुसरी फिर्याद नरसू हरि फाकडे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार चव्हाण पती-पत्नी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरसू हरि फाकडे, गणेश नरसु फाकडे, निलेश नरसु फाकडे, धीरज नरसु फाकडे सर्व रा. हरिपूर यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीनिवास चव्हाण आणि नरसू फाकडे यांच्यात पुर्वीचा वाद होता. या वादातूनच चव्हाण यांना नरसू फाकडे आणि त्याच्या मुलांनी मारहाण केली आहे. मारहाण सोडविण्यासाठी चव्हाण यांच्या पत्नी आणि आई गेल्यावर त्या दोघींनाही या संशयितांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर चव्हाण यांनी या संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
तर नरसू फाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित श्रीनिवास चव्हाण हा फाकडे यांना शिवीगाळ करत होता. त्याला शिवीगाळ करू नको असे सांगत असताना त्यांने चाकूने हल्ला केला आणि त्याच्या पत्नीने येवून काठीने मारहाण केली आहे. त्यामध्ये फाकडे जखमी झाले. जखमी फाकडे यांच्या फिर्यादीनुसार चव्हाण पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या दोन्ही प्रकरणांचा तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.