Sangli Crime : उटगी येथे पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून ! गाडीसाठी माहेरहून पैसे न आणल्यामुळे कृत्य
पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील उटगी येथील येथील विवाहिता चान्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) हिचा माहेरहून क्रुझर गाडी घेण्यासाठी पैसे आण म्हणून जाच करीत तिचा गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पती मांनतेश शिवाप्पा कोळगिरी, सासरा शिवाप्पा तम्माराया कोळगिरी, सासू महानंदा शिवाप्पा कोळगिरी या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पती महांतेश व सासरा शिवाप्पा यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
याबाबतची माहिती अशी, कोळगेरी कुटुंब उटगी गावाजवळ असलेल्या कोळगेरी वस्तीवर राहतात. कर्नाटकातील सिंदगी येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी त्याचा दुसरा विवाह झाला होता. सुरुवातीपासूनच तिचा जाच सुरू होता. गेल्या चार महिन्यापासून क्रूझर गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा पती व सासू सासऱ्यांनी लावला होता. मात्र परिस्थिती नसल्याने त्यांची ही मागणी चनाक्का पूर्ण करू शकत नव्हती. यावरून त्यांचे वारंवार खटके उडत होते. शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा याच कारणावरून नवरा बायकोत वाद झाला. वारंवार चनाक्का पैसे आणण्यास नकार देत असल्याने संतापलेल्या महांतेश व सासू सासऱ्यांनी तिचा गळा आवळून खून केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव कोळगेरी कुटूंबियांनी केला. मात्र माहेरच्या लोकांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत तिघांवर उमदी पोलीस ठाण्यात तिचा भाऊ गिरीश लक्कोड रा. खेडगी ता. इंडि यांनी फिर्याद दिली. दरम्यान, जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकानी मोठा आक्रोश केला.
महांतेशचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते. तिलाही मारहाण करून तिचा पाय त्याने मोडला होता. त्यानंतर दोन्ही कुंटुबात वाद होऊन सोन्याळच्या महिलेने सोडचिठ्ठी घेतली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील सिंदगी येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्याचे तालुक्यातील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाच्या वादावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वाद झाल्याची चर्चाही गावात सुरू असून पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
नातेवाईकांचा हंबरडा अन परिसर सुन्न
खुनाची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी शनिवारी सकाळी पंचनामा करून चनाक्काचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र माहेरचे नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन थांबविण्यात आले होते. दुपारी तिचे नातेवाईक आले. तिचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे रुग्णालय परीसर सुन्न झाला. संतप्त नातेवाईकांनी तिला मारून टाकण्याचा आरोप करीत सासरच्या लोकांबरोबर वादही घातला.