स्वस्तात सोने देण्याचे आमिष! 8 लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
या महिन्यातील चौथी घटना
जत, प्रतिनिधी
स्वस्तात कमी दराने सोने देतो म्हणून जत शहरातील एकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिन्याभरातील सोने फसवणूकीची चौथी घटना आहे. स्वस्तात सोने देतो म्हणून ८ लाखाची फसवणूक झाली आहे. याबाबतची फिर्याद मोहन संगप्पा कांबळे यांनी जत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दर्याप्पा यल्लाप्पा हवीनाळ व मेहबूब रमजान शेख (रा. दोघेही जत )या दोघाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या महिन्यातील या दोघाविरुद्ध फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत शहरातील मोहन कांबळे यांना दर्याप्पा हवीनाळ व मेहबूब रमजान शेख या दोघांनी कमी दरातील स्वस्तात सोने देतो म्हणून डिसेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत वारंवार ८ लाख रुपये घेतले. परंतु सोने ही दिले नाही नंतर पैसेही घेतलेले परत दिले नाही. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यानच्या कालावधीमध्ये २ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या साडे सव्वीस लाखाच्या सोने प्रकरणात फसवणूक केल्याने दोघाना न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे. याच कालावधीत पोलिसांनी अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोहन कांबळे यांनी जत पोलिसात धाव घेतली व ८ लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादीत विश्वासाने पैसे घेऊन सोने ही दिले नाहीत व परत घेतलेले पैसेही माघारी दिले नाहीत. या प्रकरणात आपला विश्वासघात झाले असल्याचे व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत मोहन कांबळे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.