Sangali News : सांगली आयुक्तांचे 'टार्गेट' आता झुलेलाल चौक!
सांगली महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
सांगली : महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. झुलेलाल चौक ते शंभरफुटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ४० व्यावसायिकांना नगररचना विभागाने नोटीस दिली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण तसेच फ्रंट मार्जिनमध्ये केलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ हटविण्यासाठी संबंधितांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास महापालिका कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रमुख अतिक्रमणविरोधी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शंभर फूटी रोह, आपटा पोलीस चौकी, मिरज पाठोपाठ सांगलीतील झूलेलाल चौक ते शंभर फुटीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. दुकानांसमोरील वाहने रस्त्यावरच उभी असतात.अतिक्रमणविरोधी रस्त्यांवरील मोहिमेचा भाग म्हणून झुलेलाल चौक ते शंभर फुटीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या ४० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
रस्त्यावरील अतिक्रमण,फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगररचना विभागाचे सहायक संचालक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता ए. पी. मगदूम, रवी भिंगारदेवे, यासिन मंगळवारे, शाहबाज शेख, तसेच कनिष्ठ अभियंता सिद्धार्थ चंदनशिवे, उत्कर्षा कसबेकर, दिग्विजय कोकाटे, इरफान ढालाईत हे रस्त्याचे मोजमाप, फ्रंट मार्जिनची तपासणी आणि हद्द निश्चितीचे काम करत आहेत.
बांधकामांचे नगररचना विभागाने अतिक्रमण आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणविरोधी तपशील विभागाला उपलब्ध करून दिल्याने पुढील कारवाईसाठी हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरत आहे. दहा दिवसांमध्ये झुलेलाल चौक ते शंभर फुटी रोड येथील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे संबंधितांनी काढून घेतल्यास महापालिकेच्यावतीने कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.