'श्रीं'च्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज! आज प्राणप्रतिष्ठापना! बाजारपेठेत तुफान गर्दी
सोन्या, चांदीच्या आभूषणांनीही मागणी
सांगली प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. त्यासाठी संपूर्ण सांगली नगरी सज्ज झाली आहे. सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या स्वागतासाठी डॉल्बीसह पारंपारिक वाद्यांचे नियोजन केले आहे. सजावटीच्या साहित्यांनी संपूर्ण बाजारपेठ फुलून गेली आहे. तर गणपतीसाठी लागणारे सोन्याचांदीची आभूषणे, पूजेचे साहित्य, अलंकार घेण्यासाठी सराफ पेठेतही नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण सांगलीकरांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती गणपतीप्रमाणे सार्वजनिक गणपती मंडळेही सज्ज झाली आहेत. ठिकठिकाणी मंडप, कमानी उभारल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगलीतील दत्त-माऊती रस्त्यांवरील संपूर्ण बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. गणपतीच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी लगबग सुऊ आहे. आकर्षक गणपतीच्या मूर्तीही बाजारात आल्या आहेत. गणपती मूर्ती ‘बुक’ करण्यासाठी भाविकांची लगबग सुऊ आहे.