महिला शेतकरी गटाने काढले 450 पोती शेंगांचे उत्पादन! चिखलगोठण येथील महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक
इर्जीक पद्धतने शेती करून साडे चार लाखांची बचत; गटातील प्रत्येक महिला अध्यक्ष
किरण पाटील आळते
आपल्याकडे बायकांना शेतीतलं काय कळतं ? असं म्हंटल जातं. पण बायकांना शेतीतलं सर्व कळतं हे दाखवून दिलंय तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथील कृषी महिला शेतकरी गटाने कृषी यांत्रिक युगात हद्दपार होत चाललेला गावगाड्यातून इर्जीक पद्धतने शेती करून एका 'ग्राम सहकार चळवळीला' महिलांनी पुनर्जीवित केले आहे. १५ एकर क्षेत्रात ४५० पोती शेंगांचे उत्पादन काढले व साडे चार लाख रुपयांची बचत करून सर्व शेतकर्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे चिखलगोठण येथील कृषी महिला शेतकरी गटाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
पाणी फाऊंडेशनने शेतकर्यांसाठी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन गट शेती करायला सुरूवात केली. 'फार्मर कप' स्पर्धेमुळे व महिलांच्या संघटनामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. या नवीन उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह आला व पाणी फाऊंडेशनने आयोजित केलेली 'फार्मर कप स्पर्धा आम्हीच जिकंणार हा निर्धार मनाशी ठेऊन गटातील महिला वाटचाल करत आहोत. गटशेतीत त्यांनी पहिल्यांदाच इर्जीक पद्धतने १५ एकर क्षेत्रामध्ये 'भुईमूग' हे पिक घेतले. बीजप्रक्रिया माध्यमातून बीयांची निर्मिती, बी टोकण, भांगलण , काढणी व सर्व प्रकारच्या मजूरीमध्ये तब्बल साडे चार लाख रूपयांची बचत केली आहे.
'इर्जीक पद्धतीने' म्हणजे, एकमेकांच्या शेतात जाऊन काम करून जसं की १५ महिला आहेत तर आज एकीच्या शेतात तर उद्या दुसर्यांच्या असं करून प्रत्येकाच्या शेतावर काम करण्याचा त्यांना फायदा झाला. मजुरीचा खर्च वाचू लागला.पाणी फाउंडेशनने शिकवलेल्या पद्धतीनुसार उपाय केल्यामुळे उत्पन्न जास्त मिळू लागलं.उत्पादनामध्ये जवळ जवळ दुप्पट, तिप्पट वाढ झाली.पाणी फाऊंडेशचे प्रशांत गोडबोल,ओंकार सुर्वे व राजू गवाण यांचे सहकार्य लाभले.