Sangli Breaking : इस्लामपूर आणि तासगाव लढवण्यास अजितदादा आग्रही! घड्याळ चिन्ह रुजल्याचा लाभ घेण्यासाठी प्रसंगी भाजपचे उमेदवारही स्वीकारणार?
शिवराज काटकर / सांगली
महायुतीच्या राज्यस्तरीय जागा वाटप बैठकीत खुद्द अजितदादा पवार यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमंकाळ हे दोन मतदारसंघ लढण्याचा आग्रह झाला आहे. या दोन्ही मतदारसंघात जयंत पाटील आणि आर आर पाटील यांच्यामुळे घड्याळ चिन्ह रुजले आहे. त्याचा फायदा घेत प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील (इस्लामपूर) आणि माजी खासदार संजय काका पाटील (तासगाव) यांना घड्याळ चिन्हावर लढवण्याची तयारीही अजित दादांनी दाखवल्याचे वृत्त आहे.
सांगली जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादीचे दोन प्रमुख चेहरे असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तासगाव - कवठेमंकाळ उमेदवार व स्टार प्रचारक रोहित आर आर पाटील यांच्या विरोधात धक्कादायक खेळी करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इरादा आहे. शरद पवारांच्या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिल्ह्यात प्रथमच निवडणुकीत उपयोगात येणार आहे. आज पर्यंत राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ अशी येथील जनतेची धरण आहे. त्याचा लाभ उठवण्याचा अजित दादांचा विचार आहे. पवारांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात आपले शिलादार फोडल्याचा वचपा काढण्यासाठी दादा इच्छुक आहेत. त्यासाठी घड्याळ चिन्ह रुजलेले जिल्ह्यातील दोन मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर आहेत.
महायुतीचे जागावाटप सध्या पुढच्या टप्प्यात पोहोचले आहे. इस्लामपूर मतदारसंघाबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील आग्रही आहेत. मात्र गतवेळप्रमाणेच यंदाही शिवसेनेने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. इस्लामपूर शिंदे सेनेला मिळावा यासाठी निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीलाच उघड विरोध करण्याचे धोरण सेनेने अवलंबले होते. आनंदराव पवार आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांचे नाव त्यासाठी पुढे करण्यात आले आहे. तर तासगाव-कवठे महांकाळ मध्ये गेल्या दोन निवडणुका दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई या बिजयी होत आल्या आहेत. आर. आर. पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय काका पाटील हे खासदार असल्याने तासगाव तालुक्यात एका पक्षाचा आमदार आणि दुसऱ्या पक्षाचा खासदार असे शांततेचे वातावरण होते. लोकसभेला संजय काका पाटील यांचा झालेला पराभव आणि विधानसभेला रोहित आर. आर. पाटील यांचा होत असणारा उदय लक्षात घेऊन भाजप या मतदारसंघातही इस्लामपूर प्रमाणेच संभ्रमात आहे. त्यामुळे उमेदवारांपुढे चांगल्या पर्यायाची किंवा निवडणुकीसाठी त्वेषाने उतरणाऱ्या स्टार प्रचाराकांची आवश्यकता आहे. भाजप या दोन्ही मतदार संघांकडे तेवढ्या आग्रहीपणाने पाहत नाही. ही बाब लक्षात घेऊन अजितदादा पुढे सरसावले आहेत.
अजितदादांच्या पक्षाकडे घड्याळ हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह सांगली जिल्ह्यात या दोन मतदारसंघात पक्के रुजलेले आहे. साताऱ्यामध्ये लोकसभेला पिपाणी चिन्हाने निर्माण केलेला गोंधळ आणि मुंबईत धनुष्यबाण चिन्हाने शिंदे सेनेला मिळालेली मते याचा विचार करून अजित दादांनी सांगली जिल्ह्यात फासे टाकण्याचे ठरवले आहे.
प्रसंगी भाजपचे उमेदवार स्वीकारून आपण ही जागा लढवण्यास इच्छुक आहोत आणि वाटाघाटीत हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावेत यासाठी अजितदादा आग्रही आहेत. शरद पवार यांचे या दोन्ही मतदारसंघात झालेले दौरे लक्षात घेऊन आणि जयंत पाटील व रोहित पाटील हे दोघेही आपापल्या मतदारसंघात खिळून राहतील अशी खेळी करण्याच्यादृष्टीने भाजप आणि शिंदे सेनेलाही या दोन मतदारसंघांवरील हक्क सोडणे फारसे जिकीरीचे होणार नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे निशिकांत दादा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांना आपल्या पक्षातून लढायला सिद्ध करणे दादांना शक्य आहे. त्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातीलही काही व्यक्तींमार्फत अजितदादांचे निरोप या उमेदवारांपर्यंत पोहोचले असून भाजप आपल्या या नेत्यांना दादांच्या पक्षात जाऊन लढण्यास संमती देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.