जत तालुक्यात 46 लाखाचा गांजा जप्त! बिळूर, डोर्ली गावात पोलिसांचा छापा
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे ४६ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सांयकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी व जत पोलिसांच्या पथकाने केली. बिळूर येथील संशयित आरोपी फरारी असून डोर्ली येथील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी, जत तालुक्यातील बिळूर येथे गांजाच्या पिकाची लागवड केल्याची माहिती जत पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून येथे छापा टाकण्यात आला. येथील कल्लाप्पा भविकट्टी यांची डोण हद्दीत जमीन आहे. ते अंध असल्याने त्यांनी जमीन कसण्यासाठी वाटेकरी ठेवला आहे. त्याने तुरीच्या पिकात गांजाची लागवड केली होती. पोलिसांचा छापा पडल्यानंतर वाटेकरी पळून गेला. यात पालिसांनी सुमारे ४० लाखाचा ४७२ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक जिवन कांबळे, हवालदार राज सावंत, विनोद सकटे, तोहीद मुल्ला, योगेश पाटोळे आदी कर्मचाऱ्यांनी केली.
- सायंकाळी उपविभागीय पोलिसांच्या पथकाने डोर्ली येथे छापा टाकला. येथील हिवरे रोडवर असणाऱ्या मारुती रामू रुपनूर यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाली होती. उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे येथे छापा टाकला. येथून बारा पोती गांजा जप्त करण्यात आला. याचे वजन ६० किलो होत असून किंमत सुमारे ६ लाख रुपये होते. सहाय्यक सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे, उपनिरीक्षक मनीषा नारायणकर, सुनील व्हनखंडे, केरबा चव्हाण, प्रथमेश ऐवळे, पार्वती चौगुले आदी सहभागी होते.