पाचशे वर्षांचा जुना वड कोसळला! या वृक्षासाठी कायदाही बदलावा लागला...भोसे वासियांना अतिव दु:ख
सोनी वार्ताहर
शिवकालाच्या पूर्वीपासून मिरज तालुक्यातील भोसे येथे उभा असलेला सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष पाच दिवसांच्या सलग पावसानंतर अचानक कोसळला आहे. या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा केला होता. मात्र कायदा होऊन तीन वर्षे होण्यापूर्वी महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष कोसळला आहे. आता त्याचे आहे तिथेच पुनर्वसन करावे अशी भोसे तील गावकरी यांनी मागणी केली आहे.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष भोसरीच्या यल्लमा देवीच्या दारात उभा आहे. नागपूर कोल्हापूर महामार्गावर भोसे येथे असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे अथोरिटीने घातला होता. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रवीण शिंदे आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वृक्षतोडीला विरोध केला होता. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र या कामाच्या दरम्यान वृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी असे आता हा वृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे. महामार्गाच्या कामासाठी आधी केलेल्या खोदाईमुळे त्याच्यामुळे इजा पोचली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने मुळे कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे. राज्याचा कायदा बदललेल्या आणि शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून या ऐतिहासिक मार्गावर असलेल्या या वटवृक्षाचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये हळहळ
पाचशे वर्षांचा वृक्ष आमच्या गावात आहे आणि या वृक्षाला जिवंत ठेवण्यासाठी गोष्टीतील गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारने वृक्ष तर वाचवला शिवाय कायदा ही केला होता. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाचे अभिमान सांगणारा हा वृक्ष कोसळल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. हा वृक्ष काही केल्या इथून दुसरीकडे नेऊ नये किंवा त्याचे जळण करू नये तर त्याचे पुनर्रोपण करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.