Sangli : अंगणवाडी सेविका जाणार राज्यव्यापी संपावर; शासनाला दिला इशारा
आपल्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच शासनाने आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मासिक सभा आणि मासिक अहवाल यांवर बहिष्कार टाकण्याचा ही इशारा अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला आहे.
लहान बालक, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन पुढची पिढी घडवण्याची कर्तव्य अंगणवाडी सेविका करत असतात. पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने महागाईमध्ये जगणं कठीण झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व ग्रॅज्युटी देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार व अंगणवाडी मदतनीसांना २२ हजार रु द्यावी अशी मागणी ही संघटनेने केली आहे.
सांगली जिल्ह्यातून ५ हजार अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाची शासनाने दखल न घेतल्यास मासिक सभा व मासिक अहवालावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ही संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला आहे.