सांगली जिल्ह्यात ५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान
सांगली जिल्ह्यात एकूण सात कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. सांगली, विटा, इस्लामपूर, तासगाव, आटपाडी, शिराळा, पलूस या 7 पैकी शिराळा आणि पलूस या दोन्ही बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
आता उर्वरित 5 बाजार समितीच्या निवडणुका 28 आणि 30 एप्रिल रोजी होत आहेत. या पाचपैकी 3 बाजार समितीच्या निवडणूका आज होत असून उर्वरित 2 बाजार समितीच्या निवडणूक 30 एप्रिल रोजी होऊन त्याच दिवशी उशिरा याचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती:
सांगली बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे वसंतदादा शेतकरी पॅनल विरुद्ध भाजपचे शेतकरी परिवर्तन पॅनेल अशी सरळ सरळ लढत होत आहे. मिरज , जत , आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात या बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणी एकुण 18 जागांसाठी मतदान होत आहे. 8073 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार असून 90 उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील.
काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचे येथे पॅनल असून जयंत पाटील , विक्रम पाटील , विशाल पाटील , अजितराव घोरपडे या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेचा एक गट या निवडणुकीतुन बाहेर पडला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल असून खासदार संजयकाका पाटील , विलासराव जगताप हे नेतृत्व करत आहेत. जयंत पाटील , आणि संजयकाका पाटील या दोघांच्या प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.
विटा कृषी उत्पन्न बाजार समिती:
राष्ट्रवादीचे शेतकरी परिवर्तन पॅनेल विरुद्ध काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजपचे शेतकरी विकास पॅनेल अशी लढत येथे होत आहे. या निवडणुकीत एकूण 35 उमेदवार उभे असून 3126 मतदार येथे आपला मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. सदाशिवराव पाटील ,त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलभाऊ बाबर , आणि काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम अशी लढत येथे होत आहे. विश्वजीत कदम आणि अनिल बाबर यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:
राष्ट्रवादीच्या सत्ताधारी राजारामबापू शेतकरी विकास पॅनेल विरोधात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनल अशी लढत इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी होत आहे. याठिकाणी 4752 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण 36 उमेदवारांच्या भवितव्याचा ते आज फैसला करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपा , शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी दुरंगी लढत येथे होत आहे. इस्लामपूर बाजार समिती स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील गटाकडेच आहे. पूर्वी विलासराव शिंदे गटाकडे असली तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील गटाचीच सत्ता येथे राहिली आहे. विरोधकांचे सामर्थ्य येथे अगदीच नगण्य असल्याचे दिसून येते. यावेळी भाजपचे निशिकांत पाटील नानासाहेब महाडिक यांचे दोन्ही पुत्र सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक तसेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आनंद पवार यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात पॅनल लावले आहे. येथे मात्र या गटाच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. जयंत पाटील यांच्या पॅनेलला सर्व जागा जिंकून एकहाती विजय संपादन करतात की एक दोन जागांवर विरोधी पॅनेलचे सभासद विजय मिळवण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.