संघाकडून भाजप सरकारची प्रशंसा
वृत्तसंस्था / जम्मू
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाकिस्तान आणि चीनच्या खोडसाळ आगळीकींना प्रभावीपणे पायबंद घातला आहे, अशी प्रशंसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केली आहे. अलिकडच्या काळात संघ आणि भारतीय जनता पक्षामधील मतभेद रुंदावले आहेत, अशी वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनेत्यांकडून झालेली ही प्रशंसा महत्वाची मानली जात आहे.
जम्मूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या इंद्रेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात भारताची सक्षमता वाढली असून देश आपल्या भूमीचे संरक्षण योग्य प्रकारे करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तथापि, केंद्र सरकार आणि आपल्या सेनांनी पाकिस्तानचे डावपेच हाणून पाडले. चार वेळा पाकिस्तानने भारताशी युद्धे केली. पण चारही वेळा त्याचा दारुण पराभव झाला. आता दहशतवादाविरोधातील युद्धातही पाकिस्तानला धूळ चारण्याची क्षमता आपल्या सैन्यदलांमध्ये आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सैन्यदलांचीही भलावण केली. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.