Satara : न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, संध्या सव्वालाखे यांची घोषणा
साताऱ्यात महिला काँग्रेस आंदोलन
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीला न्याय द्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आदी मागण्यांसाठी सुरू केलेल्या महिला काँग्रेसच्या आंदोलनस्थळी रविवारी महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी भेट दिली. त्यांनीही आंदोलनात सहभागी होऊन सरकारचे पितळ उघडे पाडले. सरकारने एसआयटी स्थापन केलीच नाही.
एसपी तेजस्वी सातपुते यांची फक्त देखरेख तपासावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा उघड पडला आहे. हे फसवे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याने सकाळपासूनच आंदोलनस्थळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गडबड सुरू होती.
राजेंद्र शेलार यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील साखळी आंदोलनस्थळी भेट देऊन राजेघोरपडे यांचे कौतुक केले. दुपारी एक वाजता काँग्रेस कार्यालयातील आढावा बैठक आटोपून महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, काँग्रेसचे प्रभारी पृथ्वीराज साठे आणि जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनस्थळी घोषणा देण्यास सुरुवात झाली. चाकणकर यांनी राजनीमा द्यावा, अशा आशयाचे फलक हातात घेऊन निषेध नोंदवण्यात येत होता.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सव्वालाखे यांनी डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणावरून नेमण्यात आलेल्या एसटीआय समितीचे बिंग फोडले. त्या म्हणाल्या, एसआयटी स्थापन केलेली नसून केवळ तपासावर देखरेख करण्यासाठी एसपी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचा डॉक्टर युवतीच्या भावाचा फोनही आमच्या महिला जिल्हाध्यक्षांना आलेला आहे. हे फसवे सरकार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
खुर्चा झाडीत
आंदोलनस्थळी आणलेल्या खुर्च्य कार्यकर्त्यांना कळायच्या आत फिरस्त्यांनी झाडीत नेल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर सुषमा राजेघोरपडे यांनी कार्यकर्त्याकरवी खुर्ध्या परत आंदोलनस्थळी आणल्या.
आंदोलनात असतानाच महिला कार्यकर्तीस कोसळले रडू
संध्या सव्वालाखे येणार म्हणून बाईहून एक महिला कार्यकर्ती आली होती. ती सहभागी झालेल्या मुलींना घोषणा काय द्यायच्या हे समजून सांगत होती. परंतु सव्वालाखे या आल्यानंतर त्या कार्यकर्तीला तिच्या घरातून फोन आला, की अपघात झाला आहे. ती त्या आंदोलनाच्या घोळक्यातून बाजूला येऊन रडू लागली. ही बाब महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या कार्यकर्तीच्या जवळ जाऊन आपुलकीने विचारणा करत धीर दिला.