For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समृद्धी महामार्ग : अपघात रोखायला विशेष यंत्रणा हवीच!

06:28 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
समृद्धी महामार्ग   अपघात रोखायला विशेष यंत्रणा हवीच
Advertisement

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अपघाताचा महामार्ग होतोय की काय अशी कमी दिवसात अपघातांची जास्त वाढलेली संख्या दर्शविते आहे. या समृद्धी महामार्गावर बुलढाण्याच्या सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा येथे अलीकडेच पहाटे अपघात झाला. अपघातामध्ये होरपळून 25 जण गेल्याचे प्रशासनाने जाहीर केले. ट्रॅव्हलरचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात वाहनांचे टायर फुटून 81 अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर टायर कसे असावेत याची तपासणी होण्यासाठी शासनाने नवीन यंत्रणा उभारायला हवी.  समृद्धी महामार्गातील त्रुटी शोधण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी विरोधी नेत्यांच्याकडून जोर धरू लागली आहे. विविध नेत्यांकडून समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे वेगवेगळी सांगितली जातात. प्रत्यक्ष अपघातावेळी असणारे यांच्याकडून टायर फुटल्याने बस पलटी झाल्यानंतर, डिझेल टाकी फुटून स्फोट झाल्याचे बोलले जाते. जे अपघातामध्ये वाचले त्यांना बसच्या अपघातामध्ये किरकोळ जखमा झाल्या असतील पण गेले त्यांच्या वारसांना शासनाने 5 लाख दिले म्हणजे शासनाची जबाबदारी संपत नाही. अपघात होऊच नये, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. महामार्गावर रस्त्याच्या आजुबाजुला कोठेही काहीही वस्ती नाही. सरळ मार्गामुळे वाहने वेगाने जातात. यामध्ये टायरवर घर्षणाने गरम होण्याचे प्रमाण जास्त होऊन टायर फुटत असावेत. काहींच्या मते शास्त्रीय पद्धतीने महामार्गाचे नियोजन झाले नसावे. महामार्गावर हॉटेल व इतर स्टॉल असायला हवेत. त्यामुळे सलग प्रवासाला थांबा मिळून वाहनांना तसेच चालकांना विश्रांती मिळत असते. त्यामुळे 50 ते 100 कि. मी. अंतर झाल्यावर महामार्गावर थांबण्यासाठी विश्रांतीगृहे असायला हवीत. तसेच दोन्ही बाजुला मोठाली झाडे कोठेही दिसत नाहीत. महामार्गाचे मधोमधी कमी उंचीची झाडेसुद्धा असायला हवीत. खरे तर महामार्गाचे  बांधकाम सुरू असतानाच झाडांची लागवड करायला हवी होती. केंद्रीय वाहतूक मंत्री महोदय म्हणतात की हा समृद्धी महामार्ग हा केंद्राकडून तयार करण्यात आला नसून हा राज्य सरकारने तयार केलेला आहे. त्यामुळे केंद्राचे महामार्गाचे तंत्रज्ञान यामध्ये दिसत नाही. देशात केंद्रीय वाहतूक मंत्री महोदयांनी उत्तम महामार्गाचे जाळे तयार केले आहे. याला अपवाद मुंबई-गोवा महामार्गाचा आहे. तेथेही असेच अपघाताचे प्रमाण आहे. परंतु समृद्धी महामार्गाच्या तुलनेत कमी आहे. कारण मुंबई-गोवा महामार्ग अजून पूर्णत्वाकडे गेलेला नाही. तेथील कंत्राटदार कामे सोडून जातात, असे चित्र होते. यासाठी विलंब जास्त झालेला आहेच. समृद्धी महामार्गाबाबत सत्ताधारी यांनी मीडियामधून महामार्गामध्ये काहीही दोष नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या मते समृद्धी महामार्ग तंत्रशुद्ध स्थापत्य अभियांत्रिकीचा अतिशय उत्तम नमुना आहे. झालेले अपघात हे दुर्दैवी मानवी दोषाचे आहेत. महामार्गावर स्पीड लिमीट ठरवून दिली आहे. अवजड वाहने 80 मीटर प्रती तास कि.मी. शेवटची लेन, जीप व प्रवासी बसेस 100 कि. मी. प्रतितास मिडलची लेन, सर्व लेन प्रशस्त आहेत. अचानक एक्सिलेटरवर पायाचा प्रेशर पडून गाडीचा वेग वाढतो आणि अपघात होतात. त्यामुळे स्पीड मोजण्यासाठी यंत्रणा हवी तसेच महामार्गावर सीसीटीव्ही जास्तीत जास्त हवेत.

Advertisement

-रमेश सांगावकर, कराड

Advertisement
Advertisement
Tags :

.