सम्राट राणा 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये विश्वविजेता
वृत्तसंस्था/ कैरो
युवा भारतीय नेमबाज सम्राट राणाने येथील प्रतिष्ठित आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुऊषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 20 वर्षीय सम्राट हा ऑलिंपिकमध्ये समाविष्ट असलेल्या प्रकारात विश्वविजेता होणारा पहिला भारतीय पिस्तूल नेमबाज ठरला आणि यादरम्यान भारताला या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकण्यासही त्याने मदत केली. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तितक्याच कांस्यपदकांसह भारताने पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चीनने सहा सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आघाडी घेतली आहे.
करनालचा रहिवासी असलेल्या सम्राटने अंतिम फेरीत 243.7 गुणांची शानदार कामगिरी करत चीनच्या हू काईच्या आव्हानाला मागे टाकले, ज्याने 243.3 गुणांसह पदक जिंकले. भारताचा वऊण तोमर, जो उत्तर प्रदेशातील बागपत जिह्यातील एका लहान गावातून येतो आणि ऑलिंपियन पिस्तूल स्टार सौरभ चौधरीचा चुलत भाऊ आहे, त्याने 221.7 गुणांसह चुरशीच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले. या अंतिम फेरीत तीन नेमबाजांमध्ये अनेक वेळा आघाडी बदलली. तथापि, सम्राट मूलभूत गोष्टींवर टिकून राहिला आणि एकदाही डगमगला नाही. त्याने या ठिकाणी मिळविलेले कनिष्ठ स्तरावरील यश वरिष्ठ स्तरावर देखील कायम ठेवले. त्याने याच ठिकाणी 2022 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ एअर पिस्तूल संघातून आणि कनिष्ठ मिश्र संघातून दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एकाच स्पर्धेत दोन भारतीय नेमबाजांनी पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने सम्राट (586), वऊण (586) आणि श्रवण (582) या त्रिकुटाने मिळून मिळविलेल्या 1754 गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. इटली दुसऱ्या स्थानावर राहिली, तर जर्मनीने कांस्यपदक जिंकले. दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये पदके जिंकलेली ईशा सिंग यांना महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत निराशा सहन करावी लागली. देशाच्या या अव्वल दोन नेमबाजांना पदक जिंकता आले नाही. मात्र भारताला सांघिक रौप्यपदक जिंकल्याने एक छोटासा दिलासा मिळाला. ईशा (583), मनू (580) आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली सुऊची इंदर सिंग (577) यांनी 1740 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.