‘समोशा’मुळे राजकीय वातावरण तापले
हिमाचल प्रदेशात वाद : सीआयडीकडून चौकशी
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशात आता ‘समोशा’मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समोशाशी संबंधित प्रकरणाची चौकशी आता सीआयडीला सोपविण्यात आली असून याचा चौकशी अहवालही समोर आला आहे. यात मुख्यमंत्र्यांशी समोसा आणि केक पंचतारांकित हॉटेलमधून मागविण्यात आला असला तरीही तो कर्मचाऱ्यांनाच देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे 21 ऑक्टोबर रोजी सीआयडी मुख्यालयात पोहोचले होते. तेथे त्यांच्यासाठी तीन बॉक्समध्ये समोसे आणि केक मागविण्यात आले होत. परंतु हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्यापूर्वीच ते सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यानंतर या पूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे. सीआयडी अहवालात संबंधित कर्मचाऱ्यांनी ‘सीआयडी विरोधी आणि सरकारविरोधी’ पद्धतीने काम केल्याचा उल्लेख आहे.
कुणाच्या चुकीमुळे मुख्यमंत्र्यांसाठी आणले गेलेले समोसे आणि केक सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आले याची चौकशी सीआयडीने केली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी आणलेले समोसे आणि केक हे मुख्यमंत्र्यांच्या मेन्यूत सामील नसल्याचे सेवेवर तैनात पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले होते.
सीआयडीचे अंतर्गत प्रकरण
मुख्यमंत्री आमच्या एका कार्यक्रमात मुख्य अतिथी होते, कार्यक्रम संपल्यावर चहापान सुरू असताना आणलेले खाद्यपदार्थ कुठे गेले हे पहा इतकेच कुणीतरी म्हटले होते. हे पूर्णपणे सीआयडीचे अंतर्गत प्रकरण आहे. याचा राजकीय कारणासाठी वापर होणे दुर्दैवी आहे. ज्या लोकांचे याच्याशी देणेघेणे नाही, त्यांना लक्ष्य केले जात आहे. याप्रकरणी कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही आणि कुठलीच नोटीस जारी करण्यात आलेली नाही असा दावा सीआयडीचे महासंचालक संजीव रंजन यांनी केला आहे.
सरकारने दिला नाही चौकशीचा आदेश
मुख्यमंत्री सुक्खू यांचे सल्लागार नरेश चौहान यांनी अशाप्रकारच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले नसल्याचा दावा केला. सरकारचे याप्रकरणाशी कुठलेच देणेघेणे नाही. सीआयडी स्वत:च्या पातळीवर मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ अनेक कुणाला मिळाले याची चौकशी करत आहे, असे चौहान यांनी म्हटले आहे.
भाजपकडून टीकास्त्र
काँग्रेस सरकारला राज्याच्या विकासाची चिंता नाही आणि काँग्रेसला केवळ ‘मुख्यमंत्र्यांच्या समोशा’बद्दल चिंता आहे. सुक्खू यांच्यासाठी आणल्या गेलेल्या समोशाशी संबंधित घटनेने वाद निर्माण झाला आहे. चौकशीत या चुकीला ‘सरकारविरोधी’ कृत्य ठरविण्यात आल्याची टीका भाजपचे प्रवक्ते रणधीर शर्मा यांनी केली आहे. तर चौकशी समिती ही समोशामुळे नव्हे तर चुकीच्या वर्तनामुळे स्थापन करण्यात आली होती असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सुक्खू यांनी दिले आहे.