'वंचित'ची 25 नोव्हेंबरला सन्मान यात्रा! राहूल गांधी हजर राहणार ?
राज्यात आपल्या मेळाव्यांचा धडाका लावलेल्या वंचित बहूजन आघाडीने येत्या 25 नोव्हेंबर ला दादर येथिल शिवाजी पार्क येथे संविधान सम्मान यात्रा आयोजित केली आहे अशी माहीती वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच या सन्मान यात्रेला राहूल गांधींनाही आमंत्रित केलं असून तसे निमंत्रणही राहूल गांधी यांनी दिलं असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संविधान सन्मान यात्रा माहीती सांगताना ते म्हणाले, "येत्या 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात ‘संविधान के सन्मान में’ या रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातून आम्हाला रॅलीसाठी परवानगी मिळाली आहे. रॅलीसाठीचा वेळ कमी असला तरीही आम्ही राहुल गांधी यांना आमंत्रित करत आहोत." असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील वंचितांचे प्रश्न या सन्मान यात्रेतून मांडणार असून वंचितांचे प्रश्न राष्ट्रिय प्रश्न झाले पाहीजेत असे आम्हाला वाटत आहे. आणि यासाठीच आम्ही राहूल गांधी यांना आमंत्रित केले आहे. ते येतील अशी आम्हाला आशा आहे." असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या या खुलाशामुळे वंचित बहूजन आघाडी पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे अधोरेखित झाले आहे. वंचितच्या सन्मान यात्रेला राहूल गांधी उपस्थित राहणार का हे येत्या 25 तारखेच्या कार्यक्रमात समजेल.