कारवार मतदारसंघातून समितीने निवडणूक लढवू नये!
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मत व्यक्त
खानापूर : कारवार मतदारसंघाचा विचार करता समितीचे अस्तित्व हे खानापूर तालुका मर्यादित असल्याने, तसेच यापूर्वी झालेल्या समिती आमदारांच्यावेळी खानापूर समितीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कधीच घेतलेला नाही. त्यामुळे कारवार मतदारसंघात निवडणूक न लढवणे हेच समितीच्या हिताचे ठरेल, असे वक्तव्य माजी आमदार दिगंबर पाटील यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला तालुक्यातील समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनेकांनी आपले विचार व्यक्त केले असून येत्या काही दिवसांत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण म्हणाले, कारवार मतदारसंघातून मराठा आणि मराठी भाषिक हे इतर पक्षाशी जोडले गेल्याने खानापूर वगळता समितीशी कोणीही बांधील नाही. त्यामुळे कारवार मतदारसंघात समितीच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणे हे योग्य होणार नाही. समितीच्या अस्तित्वासाठी कारवार मतदारसंघात निवडणूक लढवून कार्यकर्त्यांना वेठीस धरुन शक्ती वाया घालवणे योग्य होणार नाही. त्यापेक्षा निवडणुकीनंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रात पाठपुरावा करणे योग्य राहील, निवडणूक लढवण्यास माझा विरोध आहे. पांडुरंग सावंत म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवून समितीचे अस्तित्व दाखवणे काळाची गरज आहे. मात्र महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्याने आमचे नेते शरद पवार हे महाविकास आघाडीशी बांधील आहेत. त्यामुळे जर पवार साहेबांकडून दबाव आल्यास आम्हाला माघार घ्यावी लागेल, त्यावेळी नामुष्की ओढवेल. यासाठी योग्य विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत विचार मांडले. असे असताना समितीच्या तालुका अध्यक्षांनी निवडणूक संदर्भात पत्रकाद्वारे दोन दिवसात इच्छुकांचे अर्ज मागवून निवड प्रक्रिया जाहीर करण्याचे ठरल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून संभ्रम निर्माण झाला आहे.