For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तब्बल ७० वर्षांनी निघणार सांभारे गणपतीची मिरवणूक! दीडशे वर्षांची समृध्द परंपरा

12:55 PM Aug 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
तब्बल ७० वर्षांनी निघणार सांभारे गणपतीची मिरवणूक  दीडशे वर्षांची समृध्द परंपरा
Advertisement

संगीत महोत्सवाचे आयोजन

सांगली प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे बाप्पा गणेश चतुर्थीला येतात आणि अनंत चतुदर्शीला जातात. पण सांगलीत असाही एक बाप्पा आहे ज्याची प्राणप्रातिष्ठापना दशमीला केली जाते. तब्बल 125 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गावभाग येथील सांभारे गणपती मात्र दशमीला विराजमान होतो. सांगली संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीने आजही ही परंपरा कायम ठेवलीय. 1952 मध्ये या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला ’ब्रेक’ लागला. पण पुन्हा 70 वर्षानी यंदा अनंत चतुदर्शी दिवशी या गणपतीची मिरवणूक त्याच थाटात, पारंपरिक वादयांच्या गजरामध्ये निघणार आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, या गणपतीसमोर यापूर्वी अनेक दिग्गज गायकांनी आराधना केल्याची परंपराही आहे. लता मंगेशकर यांच्यापासून अगदी उस्ताद अलदिया खान, अब्दुल करीम खान, मोगुबाई कुर्डीकर, कागलकर बुवा, दीनानाथ मंगेशकर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे या गणेशाची परंपरा पाहता सगळ्यांसाठीच हा बाप्पा आकर्षणाचा विषय आहे. मूळचे चिंचणी (ता. तासगाव) येथील आबासाहेब राजहंस व्यवसायाने पौरोहित्य व वैद्य. तासगावचे पटवर्धन यांनी त्यांना सांगलीचे चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांच्याकडे वैद्य म्हणून पाठवले. सांगलीच्या राजमाता यांच्यावर आबासाहेबांनी यशस्वी उपचार केले. त्यामुळे चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी आबासाहेबांना राजवैद्य ही पदवी व पंचायतन देवळातील सांबाच्या देवळाची पूजा करण्याचा मान दिला. सांबाची पूजा करणारे म्हणून आबासाहेब यांचे अडनाव राजहंसचे सांभारे झाले. एकेदिवशी आबासाहेबांचे पाचसहा मित्र रात्री गप्पागोष्टी करत होते. त्याचवेळी सांगली संस्थानचा गणेशोत्सव 1895 साली सुरू झाला होता. आपणही गणेशोत्सव सुरू करावा असे मित्रांनी सुचवले.

1896 साली प्रथम आठ फूट उंचीची बसलेली शाडू मूर्तीची गणेश मूर्ती तयार करण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीचे प्रात्यक्षिक म्हणून, गणेश चतुर्थीचा आदले दिवशी रात्री गणेशमूर्ती माऊती चौकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. माऊती चौक त्यावेळी आतापेक्षा 5 फूट खाली होता त्यामुळे उतार जास्त होता. त्यात गाडीचा कणा बारीक असलेने व वजन न पेलल्याने गाड्याचे चाक तुटले व मूर्तीला इजा झाली. लगेचच तट्या व बांबू यापासून दुसरी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरूवात झाली. पण दहा फूटी गणेशमूर्ती तयार करण्यास दशमीची तिथी उजाडली. त्यामुळे दशमीला प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केली. तेव्हापासून सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थी नव्हे तर दशमीच्या दिवशी केली जाते.

Advertisement

सन 1888 साली दुर्मिळ अशा पांगिराच्या झाडाच्या लाकडापासून तिसऱ्यांदा तिसरी मूर्ती तयार करण्यात आली. पुण्याचे गोविंद सुतार आबासाहेब यांच्याकडे औषधोपचारासाठी आले होते. त्यांनी मूर्तीचा आराखडा तयार केला. वासुनांना घाडगे यांनी कागदाचा लगदा वापरून मूर्तीला आकार दिला. चौदा फूट उंच व नऊ फूट ऊंदी तसेच दीड टन वजन असलेली गणेशमूर्ती सहा महिन्यात तयार करण्यात आली.

1899 साली (आता असणाऱ्या) तिसऱ्या मूर्तीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगलीतील हे पहिले गणेशोत्सव मंडळ. सांभारे वाड्याच्या मध्यावर मूर्ती ठेवली. पहिले वर्षी आबासाहेबांचे मित्र सीताराम बापू तेली यांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्याचे ठरले. मूर्ती उचलण्यासाठी पैलवान हरिनाना पवार (पैलवान माजी आमदार संभाजीराव पवार यांचे वडील), पैलवान संभाजीराव मालगे, पैलवान भाऊशा हौंजे, पैलवान आप्पासाहेब पाटील, पैलवान सदा†शवराव महाबळ, जंबु पैलवान हे मूर्ती बैलगाडीवर ठेवण्यासाठी येत असत.
सन 1928 साली पहिल्यांदा ट्रकवऊन मिरवणूक काढली. ही मिरवणूक माऊती चौक, बालाजी चौक, राजवाडा चौक, पटेल चौक, पंचायतन गणपती मंदिर, टिळक चौक, कुंभार खिंड, सांभारे वाडा या मार्गे काढली. 1952 पर्यंत मिरवणूक सुरू होती. परंतु त्यानंतर मिरवणूक मार्गावरील विजेचे खांब व तारा मिरवणुकीस अडथळा ठरल्याने मिरवणुकीमध्ये खंड पडला. तो तब्बल 70 वर्षे.

यंदा मात्र या गणपतीची पूर्वीच्याच थाटामध्ये मिरवणूक निघणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी सांभारे यांच्या पिढीकडून सुऊ आहे. लेझीम, टाळ, मृदुंग, पारंपारिक वेष-भूषांसह महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. या गणपतीची मूर्ती माऊती चौकाजवळील सांभारे वाड्यात पाहायला मिळते. लोकमान्य टिळक सांगलीत आले होते तेव्हा ही मूर्ती पाहून त्यांनी ती पुण्याला नेण्याचा मनोदय बोलून दाखवला होता परंतु कात्रज घाटातून नेताना अडचणी येतील असे वाटल्याने त्यांनी तो विचार रद्द केला. हिच मूर्ती यंदा गणेशोत्सवाचे आकर्षण असेल.

यंदा संगीत महोत्सवाचे आयोजन
कला व संस्कृतीचा समृध्द वारसा असलेल्या सांभारे गणपतीसमोर यंदा संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. पं. सुधाकर पैठणकर (मुंबई), पं. ऋषिकेश बोडस (मिरज), विदुषी मंगलाताई जोशी (सांगली), मंदार गाडगीळ (पुणे), मिलींद कुलकर्णी (पुणे), श्रीराम हसबनीस (पुणे), नितीन देग्वेकर (मुंबई), श्रध्दा दांडेकर, अर्चना बियाणी, अभिषेक काळे, अभिषेक तेलंग, श्रध्दा जोशी, वरद जोशी, विना चौगुले, श्रुती बोकील, विकास जोशी यांच्यासह सांगली, मुंबई, पुणे येथील कलाकार सहभागी होणार आहेत.
केदार सांभारे, वैद्य आबासाहेब सांभारे यांचे पणतू.

Advertisement

.