संभल प्रकरण उच्च न्यायालयाला सुपूर्द
कनिष्ठ न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय पुढील कार्यवाही न करण्याचा आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील संभल मशीद सर्वेक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे सोपविले आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या अनुमतीशिवाय कोणतीही पुढील कारवाई करू नये, असा आदेशही दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवाल आताच उघडण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या मशीदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने 19 नोव्हेंबरला दिला होता. त्यानुसार सर्वेक्षण करण्यात येत होते. न्यायलयाच्या आदेशानुसार चाललेले सर्वेक्षण रोखण्यासाठी विशिष्ट समुदायाच्या शेकडो लोकांची गर्दी मशीद परिसरात झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दंगल होऊन हिंसाचारात 5 लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर मशीद व्यवस्थापनाने कनिष्ठ न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला ठेवली आहे. शांतता राखण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केले.
मशीद व्यवस्थापनाला आदेश
संभल मशीद व्यवस्थापनाने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील पीठाने दिला. कनिष्ठ न्यायालयाने सर्वेक्षणाचा जो आदेश दिला आहे, त्याच्या गुणवत्तेसंबंधी आम्ही कोणतेही भाष्य करणार नाही. आमची भूमिका पूर्णत: समतोल आणि नि:पक्षपाती आहे. आम्ही हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे देत आहोत. मशीद व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात त्वरित याचिका सादर करावी. तसेच उच्च न्यायालयाने याचिका सादर झाल्यापासून तीन दिवसांच्या आत ती सुनावणीसाठी घ्यावी. उच्च न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय कनिष्ठ न्यायालयाने यापुढील कार्यवाही करु नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
शांतता राखणे महत्वाचे
या प्रकरणात शांतता राखणे सर्वात महत्वाचे आहे. उत्तर प्रदेश शासनाने शाही जामा मशीद परिसरात योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवावी आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्व बाजू शांतता राखण्यास सहकार्य करतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. 8 जानेवारीला पुन्हा सुनावणीची शक्यता आहे.
प्रकरण काय आहे...
उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे एक हिंदू मंदीर आहे, असे प्रतिपादन करत काही हिंदूंनी या मशीदीच्या सर्वेक्षणासाठी कनिष्ठ न्यायालयात आवेदन सादर केले आहे. आवेदनासह अनेक पुरावेही सादर करण्यात आले आहेत. ते पाहून कनिष्ठ न्यायालयाने सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. त्यानुसार दोन दिवस सर्वेक्षण करण्यात आले. पण सर्वेक्षण होत असताना जमलेल्या जमावाने हिंसक प्रकार केल्याने दंगल निर्माण झाली होती. दंगलीत पाच लोक ठार झाले. मात्र, हे लोक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले नसून ते एकमेकांवर केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यार्थ पोलिसांनी अनेक व्हिडीओही समोर आणले आहेत. तसेच मारल्या गेलेल्यांना ज्या गोळ्या लागल्या आहेत, त्या गावठी पिस्तुलाच्या असून पोलिसांच्या पिस्तुलांच्या नाहीत, असेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा हिंसाचार नेमका कोणी घडविला, याची चौकशी केली जात आहे. दंगलखोरांमध्येच दोन गट होते आणि त्यांच्यात हा हिंसाचार झाला, असे पोलिसांचे प्रतिपादन आहे.