होनगा येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
युवा नेते राहुल जारकीहोळी यांची उपस्थिती : मंत्री सतीश जारकीहोळींच्या मदतीने गावच्या विकासाला दिशा देण्याची हाक
वार्ताहर/काकती
धर्मवीर संभाजी महाराजांनी छ. शिवाजी महाराजांसारख्या सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना सोबत घेऊन राज्य केले. आपल्या प्रिय रयतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. परंतु आपले स्वराज्य कोणाच्याही स्वाधीन केले नाही. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची आठवण अजरामर आहे. अशा या थोर धर्मवीर राजाला मानाचा मुजरा, असे प्रतिपादन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा जिजाबाई धुडूम होत्या. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण व दीपप्रज्वलन राहुल जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांनी केले. पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व स्वागत महेश आनंदाचे यांनी केले. शिवमुद्रेचे उद्घाटन माजी सैनिक बाळू बेळगावकर, चौथरा उद्घाटन महेश रामभाऊ आनंदाचे, गंगा पूजन जिजाबाई धुडूम, मूर्ती अभिषेक गोपाळ शिंदोळकर यांनी केले.
राहुल जारकीहोळी म्हणाले, छ. संभाजीराजे अत्यंत शूर योद्धा होते. कमी कालावधीत त्यांनी 120 लढाया जिंकल्या. त्यांचे स्मरण ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळींच्या मदतीने गावच्या विकासाला नवी दिशा देवूया, असे आवाहन केले. मुख्याध्यापक गिंडे यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी श्रीराम सेना तालुका अध्यक्ष भरतदादा पाटील, उद्योजक श्रीकांत कदम, महेश हलगेकर, गोपाळ शिंदोळकर, दशरथ नौखडकर, माजी सैनिक सिद्दाप्पा हुंदरे, शिवस्मारकाचे खजिनदार महेश आनंदाचे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष पुंडलिक पाटील, विजय होनमणी, जयवंत सांबरेकर, प्रदीप सांबरेकर, बसवराज वाजंत्री, बसाप्पा नाईक, बी. एस. नाईक, शांताराम नौखडकर, विठ्ठल आनंदाचे, कल्लाप्पा पाटील, संजय शिंदोळकर, भैरु परसूचे, नजीर शेख, मूर्तिकार बाबू जैनाव व जिल्ल शाहू, इतर मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुंडलिक पाटील यांनी आभार मानले.