सांबरा श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 14 मे पासून
नऊ दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन : 22 मे रोजी सांगता
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 14 मे 2024 पासून भरविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या यात्रा कमिटी, हक्कदार व ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच नऊ दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. गेल्या वर्षभरापासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची तारीख केव्हा जाहीर होणार याबाबत ग्रामस्थांत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर शुक्रवारी यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून 14 मे 2024 ही तारीख ठरविण्यात आली. तत्पूर्वी नऊ दिवस अंकी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. 14 मे रोजी रथोत्सवाने यात्रेला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीचे चार दिवस गावामध्ये रथोत्सव होणार आहे. तर शुक्रवार दि. 17 मे रोजी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. 22 मे रोजी यात्रेची सांगता होणार आहे, असे बैठकीत ठरविण्यात आले आहे. बैठकीस यात्रा कमिटीचे सदस्य, हक्कदार मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय्यत तयारीला प्रारंभ
श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित झाल्याने ग्रामस्थ पूर्वतयारीच्या कामात गुंतले आहेत. घरांची दुरुस्ती व नवीन घरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 18 वर्षानंतर होणाऱ्या यात्रेसाठी ग्रामस्थ जय्यत तयारी करू लागले आहेत.
65 ते 70 फुटी रथाचे काम सुरू
श्री महालक्ष्मी यात्रेमध्ये 65 ते 70 फूट उंच असणारा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सध्या या रथाच्या जोडणीचे काम सुरू आहे. इ. स. 1950 मध्ये येथील महालक्ष्मी यात्रेमध्ये सर्वप्रथम रथाची बांधणी करण्यात आली होती. त्यानंतर 1986 व 2006 मध्ये झालेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेमध्येही रथ बांधण्यात आला होता. आता मे 2024 मध्ये होणाऱ्या यात्रेमध्येही त्याच प्रकारच्या बांधणीचा रथ असणार आहे. यात्रा काळात येथील रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.