रुद्राण्णाला वाचवण्याचा प्रयत्न कोणीच कसा केला नाही?
तहसीलदार ऑफिस ग्रुपच्या सदस्यांना पोलिसांचा सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी तहसीलदार ऑफिस ऑल स्टाफ व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे. रुद्राण्णा यडवण्णावर (वय 34) या अधिकाऱ्याने आपल्या मृत्यूस तहसीलदार व इतर तिघे जण जबाबदार आहेत, असे स्पष्टपणे संदेश पाठविल्यानंतरही सदस्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या नेतृत्वाखाली व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांची चौकशी सुरू असून एसीपी कार्यालयात तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून एकंदर घटनेसंबंधीची माहिती घेण्यात येत आहे. आपल्या मृत्यूला तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू व अशोक कब्बलगेर हेच जबाबदार असल्याचा मेसेज रुद्राण्णाने केला होता.
मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयात त्याने आत्महत्या केली आहे. त्याआधी सोमवारी रात्री 7.31 वाजता आपल्या मृत्यूला जबाबदार कोण? यासंबंधीचा मेसेज त्याने तहसीलदार ऑफिस ऑल स्टाफ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला होता. ही गोष्ट इतर सदस्यांनी गांभीर्याने का घेतली नाही? याची चौकशी करण्यात येत आहे.
या व्हॉट्सअॅप ग्रुपवर 110 हून अधिक अधिकारी व कर्मचारी आहेत. मेसेज केल्यानंतर लगेच तहसीलदारांनी त्याला ग्रुपमधून काढून टाकले. यापेक्षा त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत? कोणीच त्याच्याशी संपर्क साधला नाही का? याची विचारणा करण्यात येत आहे. तब्बल 25 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.