शूर नौसैनिकांच्या अदम्य साहसाला सलाम
देशात नौदल दिन साजरा : ओडिशातील कार्यक्रमात राष्ट्रपतींचा सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात बुधवार, 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला. हा दिवस नौसैनिकांचे शौर्य, समर्पण आणि उपलब्धी यांना समर्पित आहे. हा दिवस केवळ आपल्या सागरी सीमा सुरक्षित करण्यात नौदलाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत नाही तर हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान देखील प्रतिबिंबित करतो.
नौदल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी दुपारी ओडिशातील पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदल दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी 15 हून अधिक जहाजे, पाणबुड्या आणि 40 हून अधिक विमानांनी प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सागरी कमांडो आणि भारतीय लष्कराच्या जवानांचाही समावेश होता. नौदलाची क्षमता आणि भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात मिग-29के आणि हॉक लढाऊ विमानांद्वारे हवाई लढाऊ सराव आणि रॉकेट फायरिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
पंतप्रधानांचा नौसैनिकांना सलाम
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल जवानांच्या समर्पण आणि धैर्याची प्रशंसा केली. अतुलनीय धैर्याने आणि समर्पणाने आपल्या समुद्राचे रक्षण करणाऱ्या नौदलाच्या शूर सैनिकांना सलाम करतो असे ट्विट पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त केले आहे. भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संरक्षणमंत्र्यांकडूनही शुभेच्छा
नौदल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आज संपूर्ण देश नौदल दिन साजरा करत असताना मी भारतीय नौदलातील सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो असे ते म्हणाले. भारतीय नौदल हे भारताच्या सागरी सुरक्षेचे रक्षण करणारे राष्ट्रीय सुरक्षा आर्किटेक्चरचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारतीय नौदल 7,500 किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय सुरक्षा किनारपट्टीचे संरक्षण करते आणि हिंदी महासागर क्षेत्रात दक्षतेने सागरी हद्दीचे रक्षण करते, असे ते म्हणाले.