For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॉल्टने 17 षटकात सामना संपवला

06:05 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सॉल्टने 17 षटकात सामना संपवला
Advertisement

इंग्लंडचा विंडीजवर 8 गड्यांनी दणदणीत विजय : सॉल्टची 47 चेंडूत 87 धावांची खेळी : बेअरस्टोचीही फटकेबाजी

Advertisement

वृत्तसंस्था /ग्रोस आयलेट (सेंट लुसिया)

येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीतील दावा मजबूत केला आहे. सुपर 8 फेरीसाठी पात्र होताना दमछाक झालेल्या इंग्लंडने या फेरीत दाखल होताच यजमान वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 17.3 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या आणि सामना 8 गडी राखून जिंकला. 47 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी साकारणाऱ्या फिल सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी यशस्वी ठरला. सेंट लुसियाच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूंवर भर देत इंग्लंडने विंडीजच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखले. जॉन्सन चार्ल्ससारख्या आक्रमक फलंदाजांला इंग्लंडने जखडून ठेवले. इंग्लंडने त्याला 34 चेंडूत 38 धावाच करु दिल्या. ब्रँडन किंग 23 धावा करुन दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला. निकोलस पूरनने 36 धावांचे योगदान दिले तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने आक्रमक खेळताना 17 चेंडूत 5 षटकारासह 36 धावा केल्या. पॉवेलला लिव्हिंगस्टोनने बाद केले तर पूरनचा अडथळा आर्चरने दूर केला. स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलही फारसा प्रभावी ठरला नाही. आदिल रशीदने 1 धावांवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर शेरफेन रुदरफोर्डने 15 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 28 धावांची खेळी केली. रुदरफोर्डच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पावणेदोनशेचा टप्पा ओलांडला. वेस्ट इंडिजने विजयासाठी इंग्लंडसमोर 181 धावांचं लक्ष्य ठेवले.

सॉल्टची वादळी खेळी, बेअरस्टोचीही फटकेबाजी

181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अवघ्या 17.3 षटकांमध्ये विजय मिळवला. फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. रोस्टन चेसने बटलरला पायचीत करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. तो 22 चेंडूत 25 धावा करुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या मोईन अलीने 13 धावा केल्या आणि रसेलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. 2 बाद 84 अशा स्थितीत बेअरस्टो सॉल्टला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. धावगतीचं आव्हान वाढत होते पण या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. या जोडीने तुफानी फलंदाजी करताना विंडीज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सॉल्टने 47 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारासह नाबाद 87 धावा केल्या. तर बटलरने त्याला चांगली साथ देताना 26 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 48 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज 20 षटकांत 4 बाद 180 (ब्रँडन किंग 23, जॉन्सन चार्ल्स 38, निकोल्स पूरन 36, रोव्हमन पॉवेल 36, रुदरफोर्ड नाबाद 28, जोफ्रा आर्चर, रशीद, मोईन अली, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी). इंग्लंड 17.3 षटकांत 2 बाद 181 (फिल सॉल्ट नाबाद 87, जोस बटलर 25, मोईन अली 13, बेअरस्टो नाबाद 48, आंद्रे रसेल व रोस्टन चेस प्रत्येकी एक बळी).

विंडीजचा स्पर्धेतील पहिला पराभव, डॉट बॉलचा विक्रमही

टी-20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. इंग्लंडविरुद्ध सामन्यात विंडीजने 180 धावा केल्या मात्र, विंडीज खेळाडूंनी फलंदाजी करताना जे चेंडू डॉट खेळले ते त्यांच्या अंगलट आले. या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी 51 बॉल डॉट खेळले. यावेळी टी-20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळण्याचा अनोखा विक्रम विंडीजने आपल्या नावे केला. दुसरीकडे इंग्लंडने केवळ 16 बॉल डॉट खेळले. परिणामी, इंग्लंडने विंडीजचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला.

Advertisement
Tags :

.