सलमान खान पहिल्या खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बॅसेडर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय मातीतील खो-खो आता कात टाकून पुढे जात आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने पहिला वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी, 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय सुपरस्टार सलमान खान यांना ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली. यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, महासचिव एम. एस. त्यागी, तसेच भारतीय पुरुष आणि महिला संघांचे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते. सलमान खान पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी खूप उत्साही आहे. या खेळाची व आपली नाळ जुळली असल्याचे सलमानने सांगितले. तसेच खो-खो सारखा आपल्या मातीतील खेळ जगभर पसरत असल्याचे पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे तो म्हणाला. या खो खो वर्ल्ड कपमध्ये 24 देशांचे संघ सहभागी होणार असून हि स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.