आता खूप झाले : प्रशिक्षक गंभीर
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला घेतले फैलावर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला पहिला कसोटी सामना सोडल्यास कांगांरुविरुद्ध साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मेलबर्न कसोटी अनिर्णीत राखण्याच्या उंबरठ्यावर असताना अचानक ऋषभ पंतची विकेट गेली अन् टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीम इंडियाला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर कोच सरांनी खेळाडूंची घेतलेली शाळा महत्त्वाची मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरने संपूर्ण संघाला फटकारले आहे. त्याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसले तरी नैसर्गिक खेळ आणि परिस्थितीनुसार खेळ न करण्याच्या खेळाडूंच्या वृत्तीवर तो खूश दिसत नव्हता. गेल्या सहा महिन्यांत त्याने संघाला हवे ते करु दिले. याबद्दल गंभीर म्हणाले, पण आता संघाला कसे खेळायचे आहे हे ते स्वत: ‘निर्णय’ घेणार असल्याचेही कळते. जो खेळाडू त्यांच्या रणनीतीचे पालन करणार नाही त्याला वगळण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर आता भारताला मालिका जिंकणे अशक्य असून शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळाल्यास टीम इंडिया ही मालिका बरोबरीत सोडवेल आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडेच राहील. मात्र, यासाठी पाचवा कसोटी सामना जिंकणे टीम इंडियासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच प्रशिक्षक गौतम गंभीरनी कंबर कसली असून ड्रेसिंग रूममध्ये बोलताना त्यांनी खेळाडूंना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता खूप झालं...
चौथ्या कसोटीतील पराभवानंतर आता पुरे झाले..., असं म्हणत गौतम गंभीर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले. तसेच गंभीर यांनी वरिष्ठ खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केली आहे. ठरलेल्या योजनांचे अनुसरण करण्याऐवजी खेळाडू स्वत:च्या इच्छेनुसार वागत असल्याचे गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रुममधील बैठकीत सांगितले. तसेच आतापासून रणनीती न पाळल्यास त्यांना ‘धन्यवाद असे म्हटले जाईल, असा इशाराही गंभीर यांनी भारतीय खेळाडूंना दिला आहे.
भारताने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाला बीजीटीमध्ये यशस्वी होऊ दिलेले नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दोनदा झेंडा फडकवला आहे. पण यावेळी सिडनी कसोटी हरल्यास मालिका पराभवामुळे ट्रॉफी गमवावी लागेल. अशा परिस्थितीत गौतम गंभीर यांना मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाच्या पुनरागमनासाठी योजना तयार करावी लागेल. जेणेकरुन पाचवा सामना जिंकून मालिका 2-2 अशी संपुष्टात आणता येईल.
चेतेश्वर पुजारावरुनही मतभेद
बॉर्डर-गावसकर मालिकेत चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन करण्याची मागणी गंभीरने केली होती. पुजाराने कसोटी संघात पुनरागमन करावे, अशी गंभीरची इच्छा होती, परंतु निवडकर्त्यांनी त्यास नकार दिला. 36 वर्षीय पुजाराने गेल्या दोन ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2018 च्या दौऱ्यात त्याने सात डावात सर्वाधिक 521 धावा केल्या. 2011 व्या दौऱ्यातही त्याने 271 धावा केल्या होत्या. विशेषत: पुजाराची संयमी भूमिका भारतीय संघासाठी कायमच महत्वपूर्ण अशी राहिली आहे. अशा परिस्थितीत पुजारा टीम इंडियामध्ये असायला हवा असे गंभीर यांनी मत नोंदवले होते. पण, त्यांची ही मागणी मंजूर होऊ शकली नाही.