भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सलिमा टेटे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चीनमधील हाँगझोयु येथे 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 20 सदस्यांचा भारतीय महिला हॉकी संघ जाहीर केला असून अनुभवी सलिमा टेटेकडे कर्णधारपदाची धुरा सोपविली आहे. चीनमध्ये होणाऱ्या या आगामी आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेतील विजेत्या संघाला 2026 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारताचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटामध्ये भारत, जपान, थायलंड आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना थायलंडबरोबर 5 सप्टेंबरला, दुसरा सामना 6 सप्टेंबरला जपानबरोबर तर या गटातील भारताचा शेवटचा सामना सिंगापूरबरोबर 8 सप्टेंबरला खेळविला जाईल.
23 वर्षीय सलिमा टेटे ही भारतीय महिला हॉकी संघातील महत्त्वाची खेळाडू म्हणून ओळखली जाते. गेल्या वर्षी सलिमाची भारतीय महिला हॉकी संघाच्या कप्तानपदी नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती प्रमुख प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी दिली आहे. हा संघ अनुभवी आणि नवोदितांचा संमिश्र आणि समतोल असल्याचे सांगण्यात आले. गोलरक्षणाची जबाबदारी बांसुरी सोळंकी आणि बिछु देवी खरीबाम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मनीषा चौहान, उदिता, ज्योती, सुमनदेवी टी., निकी प्रधान, इशाकी चौधरी यांच्यावर बचावळफळींची जबाबदारी राहील. नेहा, वैष्णवी फाळके, कर्णधार सलिमा टेटे, शर्मिला देवी, लालरेमसियामी आणि सुनेलिता टोपो मध्यफळीत खेळतील. नवनीत कौर, ऋतुजा पिसाळ, ब्युटी डुंगडुंग, मुमताज खान, दीपिका आणि संगीता कुमारी यांच्यावर आघाडी फळीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.