सलिमा टेटेकडे कप्तानपदाची धुरा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बिहारमधील राजगिर हॉकी स्टेडियमध्ये 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 18 सदस्यांचा संघ सोमवारी जाहीर केला. या संघाच्या कर्णधारपदी सलिमा टेटेची निवड करण्यात आली आहे. नवनीत कौर उपकर्णधार म्हणून राहिल.
गेल्यावर्षी रांचीमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकाविले होते. मात्र यावेळी भारतीय महिला हॉकी संघाला कडव्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड द्यावे लागेल. सदर स्पर्धेमध्ये यजमान भारत, विद्यमान ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन, जपान, कोरीया, मलेशिया आणि थायलंड यांचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 11 नोव्हेंबरला मलेशियाबरोबर होईल. गोलरक्षणाची जबाबदारी अनुभवी सविता आणि बिचु देवी यांच्यावर राहिल. उदिता, ज्योती, ईशिका चौधरी, सुशीला छानु, वैष्णवी फाळके यांच्यावर बचाव फळीची तर कर्णधार सलीमा टेटे, नेहा, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनेलिता टोपो आणि लालरीमसीयामी यांच्यावर मध्यफळीची तर नवनीत कौर, संगीता कुमारी, दिपीका, प्रिती दुबे आणि ब्युटी डुंगडुंग आघाडी फळी सांभाळतील.