For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सलिमा टेटे

06:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सलिमा टेटे
Advertisement

प्रो लीगसाठी 25 सदस्यीय संघ जाहीर, तीन खेळाडूंना डच्चू

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

या महिन्यात इंग्लंड व बेल्जियविरुद्ध होणाऱ्या एफआयएच प्रो ली महिला हॉकी लढतीसाठी 24 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाच्या ऐवजी मिडफिल्डर सलिमा टेटेकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर नवनीत कौरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘संघाचे नेतृत्व करण्याची माझी नियुक्ती झाली, याचा मला खूप आनंद वाटतो. ही मोठी जबाबदारी असून या नव्या भूमिकेत काम करण्यास मी उत्सुक झाले आहे. आमचा स्ट्राँग संघ असून त्यात अनुभवी व युवा खेळाडूंचा भरणा आहे,’ असे नवनियुक्त कर्णधार सलिमा टेटे म्हणाली. ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाची सविता ही कर्णधार होती. त्यानंतर मायदेशात झालेल्या प्रो लीगमधील सामन्यातही तिने नेतृत्व केले होते. सलिमाला अलीकडेच प्रतिष्ठेचा हॉकी इंडिया बलबिर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकीपटूला हा पुरस्कार देण्यात येतो. तीन अपवाद वगळता फेब्रुवारीत भुवनेश्वर व राऊरकेला येथे झालेल्या प्रो लीगमध्ये खेळलेला संघच कायम ठेवण्यात आला आहे. डिफेंडर गुरजित कौर, मिडफिल्डर्स सोनिका व निशा आणि स्ट्रायकर ब्युटी डुंगडुंग यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी महिमा चौधरी, मनीषा चौहान, प्रीती दुबे, दीपिका सोरेंग यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमधील लढती 22 व 26 मे रोजी तर इंग्लंडविरुद्धचे सामने 1 व 9 जून रोजी होतील. भारतीय संघ अर्जेन्टिना व बेल्जियमविरुद्ध पहिल्या टप्प्यात दोनदा खेळेल. यातील पहिला सामना 22 मे रोजी अर्जेन्टिनाविरुद्ध होईल. लंडनमधील टप्प्यात भारताचे सामने ग्र्रेट ब्रिटन व जर्मनी यांच्याशी होतील. भारतीय संघ सध्या प्रो लीग गुणतक्त्यात 8 सामन्यांत 8 गुण घेत सहाव्या स्थानावर आहे.

Advertisement

निवड झालेला भारतीय महिला हॉकी संघ

  • गोलरक्षक-सविता पुनिया, बिच्छू देवी खारिबम.
  • बचावपटू- निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका, ज्योतील छेत्री, महिमा चौधरी.
  • मध्यफळी-सलिमा टेटे (कर्णधार), वैष्णवी विठ्ठल फाळके, नवनीत कौर (उपकर्णधार), नेहा, ज्योती, बलजीत कौर, मनीषा चौहान, लालरेमसियामी.
  • आघाडी फळी-मुमताज खान, संगीता कुमारी, दीपिका, शर्मिला देवी, प्रीती दुबे, वंदना कटारिया, सुनेलिता टोपो, दीपिका सोरेंग.
Advertisement
Tags :

.