Fertilizer News : खोट्या सह्या, फोटोचा वापर; बनावट खरेदी खतप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरीनजीकच्या कारवांचीवाडीतील 17.90 गुंठे जमिनीची विक्री
रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी आदिशक्तीनगर येथील जागेचे बनावट खरेदीखत तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 6 संशयितांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी खरेदीखतावर खोट्या सह्या मारल्या असून दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो वापरुन दुय्यम निबंधकालाही फसवले असल्याची तक्रार चंद्रकांत वासू कांबळे (62, ऱा कारवांचीवाडी, पोमेंडी बुद्रुक रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे.
संगीता चंद्रकांत घाणेकर (रा. डफळचोळवाडी खेडशी, रत्नागिरी), सुवर्णा रघुनाथ कळंबटे (रा. मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी), सुप्रिया संजय कोत्रे (रा. भाटलेवाडी कापडगांव, रत्नागिरी), संतोष वासुदेव कांबळे (ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी), सुरेश वासुदेव कांबळे (रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी), अशोक विठ्ठल घवाळी (रा. पानवल, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुह्यातील माहितीनुसार, तक्रारदार चंद्रकांत कांबळे व संशयित आरोपी यांची कारवांचीवाडी आदिशक्तीनगर येथे 17.90 गुंठे सामायिक वर्ग एकची जमीन आहे. 2023 मध्ये संशयित आरोपी संतोष व सुरेश यांनी तक्रारदार यांना आपण या जमिनीची विक्री करुया, असे सांगितले होते. त्यावेळी तुम्ही गिऱ्हाईक घेवून या, समोरासमोर बोलणी करु असे तक्रारदार यांनी त्यांना सांगितले होते.
यानंतर फेब्रुवारी 2025 रोजी तक्रारदार हे सातबारा काढण्यासाठी पोमेंडी बुद्रुक कार्यालयात गेले असता त्यांच्या जागेची विक्री झाली असून खरेदीखत करण्यात आल्याचे सांगितले. आपल्या जागेची विक्री झाल्याचे समजताच तक्रारदार यांच्या पायाखालची वाळू सरकली.
तक्रारदार चंद्रकांत कांबळे यांनी यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात धाव घेतल़ी येथे त्यांनी खेरदीखताची छायांकित प्रत मागून घेतली. त्यावेळी त्यांना संशयित आरोपींनी सामाईक प्रतिज्ञापत्र केल्याचे दिसून आले. त्यामध्ये तक्रारदार यांचे नाव हाती लिहिण्यात आले होते.
तसेच दुसऱ्याच पुरुषाचा फोटो लावून त्यावर तक्रारदार यांचा अंगठा व बनावट सही केल्याचे दिसले. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय येथे तयार करण्यात आलेल्या खरेदीखतावर तक्रारदार यांच्या नावासमोर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो लावून त्यावर सही व अंगठा घेतला व आपल्या जागेची विक्री केली, अशी तक्रार चंद्रकांत कांबळे यांनी ग्रामीण पोलिसात केली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींविऊद्ध भारतीय न्याय संहिता 227, 228, 229, 236, 237, 3 (5), 318 (4), 335, 336 (1),(2)(3) नुसार गुन्हा दाखल केल़ा