चार आण्यांच्या जमिनीची 1.19 लाखांना विक्री!
झुवारीच्या जमीन घोटाळ्यावरून विधानसभेत वादंग : सखोल चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रती चौ. मी. केवळ चार आण्यात खरेदी करून झुवारी कंपनीला दिलेली तब्बल 540 हेक्टर जमीन आज सोन्यापेक्षाही दुप्पट दराने परस्पर विकण्यात येत आहे, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. यात 50 हजार कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा असून राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे, असा दावाही त्यांनी केला. लोधा नामक एका अब्जाधिशाने या भूमीला विळखा घातला असून ही व्यक्ती म्हणजे गोव्यासाठी दुसरा ‘वास्को द गामा’ ठरणार आहे, अशी भीतीही सरदेसाई यांनी व्यक्त केली. अशाप्रकारे आक्रमकतेने आरोप करणाऱ्या सरदेसाई यांना रोखताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी झुवारी जमीन विक्री प्रकरणाची सरकाकडून सखोल चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. तसेच पूर्वी देण्यात आलेल्या मंजुरी रद्द करण्यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सांकवाळ येथील कोमुनिदाद मालकीची 540 हेक्टर जमीन झुवारी खत कारखान्यासाठी देताना मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून गोमंतकीयांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, हा उदात्त हेतू ठेवला होता. परंतु आज ती जमीन सोन्यापेक्षाही दुप्पट भाव देणारी मालमत्ता ठरली आहे आणि सरकारी मालकीची जमीन असतानाही विविध क्लुप्त्या लढवून आणि लोधा सारख्या अब्जाधिशांच्या माध्यमातून या जमिनीत हजारो प्लॉट पाडून त्यांची विक्री सुरू आहे. त्याशिवाय भविष्यात अन्य मोठ्या गृह प्रकल्पांचेही तेथे नियोजन आहे. या जमिनीत बांधण्यात आलेल्या फ्लॅटची आज प्रती चौरस 55 हजार ऊपये किंमतीने विक्री सुरू आहे तर प्लॉटसाठी प्रती चौ. 1.19 लाख ऊपये मोजून लोक खरेदी करत आहेत. हे सर्व ग्राहक बिगर गोमंतकीय उच्चभ्रू लोक असून एवढ्या महाग किंमतीत कोणताही गोमंतकीय ती जमीन खरेदी करू शकणार नाही, असे सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
सांकवाळ जमिनीचे खरे मालक कोमुनिदाद : बाबूश
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या जमिनीचे खरे मालक कोमुनिदाद आहे. अशावेळी ही जमीन अन्य कुणाच्या नावावर हस्तांतरीत करता येऊ शकते का? यासंबंधी आम्ही कायदेतज्ञांकडे सल्ला मागितला असून त्याच्या प्रतीक्षेत आहोत. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल, असे मोन्सेरात यांनी पुढे सांगितले.
औद्योगिक जमिनीत गृहप्रकल्प होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
दरम्यान, या मुद्यावरून मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. ज्या उद्देशाने भाऊसाहेबांनी झुवारीसाठी जमीन दिली होती त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. झुवारीसाठी जमीन औद्योगिक वापरासाठी देण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तेथे गृहप्रकल्प किंवा अन्य कोणताही प्रकल्प येणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.