जर्मनीच्या प्रतिबंधित कंपनीला स्फोटकांची विक्री
सरकारी मालकीच्या कंपनीकडून हलगर्जीपणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी मालकीच्या एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीने जर्मन कंपनी राइनमेटलला सुमारे 500 टन स्फोटकांची विक्री केली आहे. मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा पुरवठा करण्यात आल्याचे समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. राइनमेटलला भ्रष्टाचारामुळे 2012 पासून प्रतिबंधित करण्यात आले होते. मागील वर्षाच्या अखेरीस आणि चालू वर्षाच्या प्रारंभी या कंपनीला स्फोटकांचा पुरवठा करण्यात आला आहे. सरकारच्या निदर्शनास हा प्रकार आल्यावर अखेरच खेप रोखण्यात आल्याचे समजते.
भारतीय कंपनी म्युनिशन इंडिया लिमिटेडला (एमआयएल) मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या ऑर्डर्स प्राप्त होत आहेत. रशिया-युक्रेन संघर्षानंतर स्फोटकांची जागतिक मागणी शिगेला पोहोचली आहे. भारतीय कंपनीकडे या स्फोटकांच्या निर्मितीसाठी उत्पादन क्षमता आहे आणि अनेक देश याकरता ऑर्डर्स देऊ पाहत आहेत. स्फोटकांच्या विक्रीचा व्यवहार एका मध्यस्थाच्या माध्यमातून करण्यात आला होता. 144 टनाची पहिली खेप ऑक्टोबर 2023 मध्ये पाठविण्यात आली होती. पुरवठा एक्सपल नावाच्या एका स्पॅनिश कंपनीला करण्यात आला होता. तर सार्वजनिक नोंदीनुसार राइनमेटल या कंपनीने या कंपनीचे पूर्वीच अधिग्रहण केले होते.
अखेरची खेप रोखली
दोन अतिरिक्त शिपमेंट पाठविण्यात आल्या, ज्यातील अखेरची शिपमेंट मार्च 2024 मध्ये पाठविण्यात आली होती. डिलिव्हरीसाठी मूळ करार एक्पसलसोबत करण्यात आला होता. परंतु कपंनीने मालकी बदलून राइनमेटलला दिली आणि याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही.