साळावलीचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’
गतवर्षाच्या तुलनेत यंदा 12 दिवस आधीच जलाशय भरून वाहण्यास प्रारंभ,पर्यटकांना आनंद लुटण्याचा मार्ग मोकळा
प्रसाद तिळवे/सांगे
पर्यटक आणि राज्यातील स्थानिक लोकांसाठी पावसाळ्यात आकर्षणाचा विषय असलेल्या सांगे येथील साळावली धरणाचा जलाशय तुडुंब भरला असून बुधवारी सायंकाळी ओव्हरफ्लो होऊ लागला. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 12 दिवस आधी धरणाचा जलाशय भरला आहे. त्यामुळे पर्यटकांना भरून वाहणाऱ्या जलाशयाचा आनंद लुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा पाऊस मे महिन्यात सुरू होऊन कायम राहिल्याने धरणाचा जलाशय जून महिन्यातच भरला आहे. ‘तरुण भारत’ने जलाशय अर्धाअधिक भरलेला असल्याने यंदा लवकर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त रविवार 22 रोजी प्रसिद्ध केले होते. जलाशय कधी ओव्हरफ्लो होईल याचे सर्वांनाच कुतूहल असत्ते. वास्तविक केवळ सांगेवासीयच नव्हे, तर तमाम गोमंतकीय व पर्यटक ओव्हरफ्लो होण्याच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. तो क्षण बुधवार दि. 25 जून रोजी सायं. 5.30 वा. आला. मनाला भुरळ पाडणारे हे दृश्य पाहण्यासाठी आता साळावली धरणाकडे पर्यटकांची रीघ लागणार आहे..
धरणाचा जलाशय ओव्हरफ्लो होऊ लागला की, येथे वर्षा पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त होते. येथील वातावरण माणसाला प्रसन्न करून सोडते. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक धरणाला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पावसाळ्यात येथील आनंद तसा निराळाच असतो. जलाशय भरून वाहू लागल्यानंतर उंचावरून पडणारे पाणी अंगावर शहारे आणते. धरणाच्या जलाशयात सध्या 234.36 दशलक्ष घन मीटर पाणी असून जलाशयाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग 60 घन मीटर प्रति सेकंद असा आहे.
साळावली धरण पाण्याच्या बाबतीत दक्षिण गोव्याला जसे वरदान आहे तसेच ते पर्यटनदृष्ट्या गोव्याची शान वाढवते. त्यातच धरणाच्या पायथ्याशी असलेले बोटॅनिकल गार्डन येथील सौंदर्यात अधिक भर घालते. यंदा पाऊस उत्तम प्रकारे पडल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत जलाशय लवकर भरला आहे. गेल्या वर्षी धरणाचा जलाशय 7 जुलैला भरला होता. जलाशयातील पाण्याची पातळी 41.15 मीटरवर आली की, ओव्हरफ्लो होऊ लागतो. यंदा बुधवार सकाळपर्यंत या भागात 49.4 इंच पाऊस पडला असून गतवर्षी 54.17 इंच पाऊस पडला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत 4.74 इंच कमी पाऊस पडला आहे. यावर्षी दि. 20 मे रोजी पाण्याची पातळी 32.61 मीटर इतकी होती, तर गेल्या वर्षी 6 जूनला 30.46 मीटर इतकी पातळी राहिली होती. धरणाच्या कालव्यातून सध्या 2.5 क्युमेक्स पाणी सोडले जात आहे.
धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने पावसाळ्यात बोटॅनिकल गार्डनचा महसूल देखील वाढत असतो. या धरणाला टेकूनच काही अंतरावर अत्यंत जुने आणि मूळ कुर्डी येथून जशास तसे स्तलांतरित केलेले शेळपे येथील श्री महादेवाचे मंदिर असून त्यालाही पर्यटक आवर्जुन भेटी देतात. धरणावर सुट्टीच्या दिवशी तसेच विकएंडला अक्षरश: गर्दी होत असते. धरणाच्या दोन्ही बाजूंनी आपली वाहने पार्क करून पायी चालत जाऊन धरण पाहावे लागते.