For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साळावलीचा जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

06:22 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
साळावलीचा जलाशय  ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर
Advertisement

प्रतिनिधी/ सांगे

Advertisement

सांगे तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. साळावळी धरणाच्या जलाशयाला येऊन मिळणारे जलस्रोत आणि घाट भागातही पावसाची संततधार सुरू असून साळावळी धरणाच्या जलाशयाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास लवकरच जलाशय तुडुंब भरून वाहू लागणार आहे.

शनिवारी सकाळी या धरणाच्या जलाशयातील पाणी पातळी 39.4 मीटर्स झाली होती, तर 24 तासांत 3.7 इंच इतका पाऊस पडला होता. जलाशयातील पाणी पातळी 41.15 मीटर्सरवर पेहोचली की, तो ‘ओव्हरफ्लो’ होऊ लागतो. गेल्या वर्षी जलाशय 20 जुलैला भरून ‘ओव्हरफ्लो होऊ लागला होता. जलाशय तुडुंब भरून वाहू लागण्याच्या क्षणाची वाट पर्यटक आणि स्थानिक नागरिक पाहत असतात.

Advertisement

हा क्षण जवळ आला असून येत्या चार-पाच दिवसात धरणाचा जलाशय भरून वाहू लागेल असे दिसत आहे. साळवली धरणाचा जलाशय ओव्हरफ्लो होऊ लागला की, येथे वर्षा पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त होते. येथील वातावरण माणसाला प्रसन्न करून सोडते. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक धरणाला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. अजून तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडला की, जलाशय तुडुंब भरून वाहणार आहे.

पावसाळ्यात येथील आनंद तसा निराळाच असतो. पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच असते. जुलै महिना सुरू झाला की, जलाशय तुडुंब भरायला सुरुवात होते. येथील जलाशय भरल्यानंतर उंचावरून पडणारे पाणी अंगावर शहारे आणते. धरणाच्या जलाशयात 236.800 दशलक्ष घन मीटर पाणी साठविण्याची क्षमता असून जलाशयाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण 60 घन मीटर प्रति सेकंद इतके असते.

दरम्यान, सांगे तालुक्यात मागील तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पोत्रे, नायकिणी आणि नेत्रावती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. झाडे कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. त्यातच ग्रामीण भागात विजेचा लपंडाव चालूच आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबद्दल भाटीचे माजी पंच अमोल भाटीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नेत्रावळी अभयारण्यातील धबधबे पूर्ण प्रवाहित झाले आहेत. घाटमाथ्यावर पाऊस चालूच असल्याने धबधबे धो धो कोसळत आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने धबधब्यावर जाता येत नाही. मात्र अभयारण्यात ट्रेलिंग करण्यास मुभा आहे, अशी माहिती मिळाली.

Advertisement
Tags :

.