दर तासाला 7 हजारांहून अधिक पगार
केवळ मांजराची करावी लागणार देखभाल
चांगल्या नोकरीचे निकष लोकांसाठी वेगवेगळे आहेत, तरीही लोकांमध्ये यावरून धारणा मिळत्याजुळत्या असतात. यात अधिक वेतन ही सर्वात मोठी अट असू शकते. अशाच एका नोकरीची जाहिरात चर्चेत असून यात वेतन अधिक आहे, याचबरोबर कामाची यादीही चकित करणारी आहे. या कामासाठी दिले जाणारे वेतन दर तासाला 65 डॉलर्स म्हणजेच 7 हजार रुपये इतके अधिक आहे. या अनोख्या नोकरीच्या जाहिरातीत ही नोकरी एविएमार्केट नावाच्या लंडन येथील विमान विक्रमी कंपनीने स्वत:च्या ऑफिसमधील मांजर जेरीच्या देखभालीसाठी काढली आहे. जेरी 7 वर्षांचे ब्रिटिश शॉर्टहेयर मांजर असून त्याच्यासाठी कंपनीला एक समर्पित देखभाल करणाऱ्या व्यक्तीचा शोध आहे. ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने 400 हून अधिक जणांनी अर्ज केले.
यामुळे कंपनीला ही जाहिरात हटवावी लागली. या नोकरीच्या भरतीसाठी जबाबदार कर्मचारी लिसा बॉन्ड यांनी जेरीला ऑफिसचा जेंटलमेन संबोधिले. ही नोकरी एक सुसंस्कृत ब्रिटिश शॉर्टहेयर मांजराची सातत्याने अन् काळजीपूर्वक देखभालीसाठी आहे. जेणेकरून त्याच्या दिनचर्येला सर्वोत्तम स्तरावर कायम ठेवता येईल असे त्यांनी म्हटले आहे. नोकरीच्या कर्तव्यांमध्ये दर महिन्याला हॅरड्स येथुन जेरीसाठी नवी खेळणी खरेदी करणे, त्याच्या आरोग्यावर नजर ठेवणे अन् शांत तसेच सन्मानजनक वातावरण सुनिश्चित करणे सामील आहे. याचबरोबर जेरीसोबत नियमित स्वरुपात खेळणे, त्याच्या खाण्याचे ठिकाण अन् लिटर बॉक्सची सफाई करणे, ताजे दूध आणि भोजन उपलब्ध करविणे आणि दररोज सौम्य ग्रूमिंग करणे देखील या भूमिकेचा हिस्सा आहे. खासकरून दर शुक्रवारी जेरीच्या आरामासाठी ऑफिसमध्ये संगीत वाजवावे लागेल.
मांजराला एकटे न सोडण्याची इच्छा
जेरी कंपनीचे रशियन बॉस व्हिक्टर मार्टीनोव यांचे पाळीव मांजर आहे. मार्टीनोव यांनी जेरीला कोवेंट गार्डन येथील ऑफिसमध्ये आणण्यास सुरू केले, कारण ते स्वत: ऑफिस आणि व्यावसायिक दौऱ्यांमध्ये व्यग्र असायचे. मांजरांनी एकटं राहणं त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची पसंती
जेरीला ऑफिसमध्ये आणल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल देखील वाढले आहे. प्रत्येक जण त्याच्या प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो, तो ऑफिसमध्ये येत असल्याने कर्मचारी अधिक प्रेरित आहेत. याचबरोबर जेरी ऑफिससाठी लकी असल्याचे मार्टिनोव यांचे सांगणे आहे.
नोकरीचे स्वरुप
ही नोकरी पूर्णवेळ आधारावर आठवड्यात 40 तासांसाठी आहे. यामुळे वर्षाकाठी या नोकरीतून 1.4 कोटी रुपये कमाविता येणार आहेत. ब्रिटनमध्ये राष्ट्रीय किमान मजुरी 1400 रुपये प्रतितास इतकी आहे. जेरीच्या देखभालीसाठी सरकारी दरापेक्षा 5 पट अधिक रक्कम मिळणार आहे. नोकरीसाठी आवश्यकतांमध्ये पाळीव प्राण्याच्या देखभालीचा अनुभव, विश्वसनीयता, पशू देखभालीबद्दल उत्साहपूर्ण दृष्टीकोन सामील आहे.