साक्षी, जस्मीन, लक्ष्य चहर उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / अस्ताना
भारतीय मुष्टियोद्धा साक्षी, लक्ष्य चहर आणि जस्मीन यांनी मंगळवारी येथील बीलाईन अरेना येथे विजय नोंदवून जागतिक बॉक्सिंग कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महिलांच्या 54 किलो गटात साक्षीने प्री-क्वार्टरफायनल लढतीत इंग्लंडच्या चार्ली डेव्हिसनला 5-0 असे एकतर्फी पराभूत करण्यासाठी संयमी प्रदर्शन केले. त्यानंतर महिलांच्या 57 किलो गटात जस्मीनने आत्मविश्वासाने कामगिरी करत अझरबैजानच्या आयनूर मिकायलोवाला त्याच फरकाने पराभूत करुन अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले. पुरुषांच्या 80 किलो गटात लक्ष्यने दमदार कामगिरी केली आणि बल्गेरियाच्या विल्यम चोलोव्हला 4-1 अशा फरकाने मागे टाकत आगेकूच केली.
तथापि, पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जपानच्या रुई यामागुचीविरुद्ध चुरशीच्या लढतीनंतर मनीष राठोड स्पर्धेतून बाहेर पडला. साक्षी, लक्ष्य आणि जस्मीन आता पुढच्या फेरीत सचिन सिवाच, हितेश गुलिया, मुस्कान, मीनाक्षी आणि संजू यांच्यासोबत सामील झाले आहेत. अस्ताना येथील या स्पर्धेत भारताची मजबूत सुरुवात अधोरेखित झाली आहे.