For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सख्यत्त्वे त्वांचि रक्षी

06:41 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सख्यत्त्वे त्वांचि रक्षी
Advertisement

सुन री सखी मेरी प्यारी सखी

Advertisement

ये दिल कहीं खोया है मेरा

जाने कहाँ उसे भूल गया

Advertisement

नहीं कुछ भी है मुझको पता

कमालीचा सुरेख वाद्यमेळ आणि स्वर्गीय सूर याचा एकाच वेळेस अनुभव देणारं हरिहरनजींचं हे गाणं. त्यात ‘सुन री सखी’ म्हणताना त्या सखीला मारलेली हाक इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की कुणाही स्त्राrला थांबावंसं वाटेलच. या गाण्यातली सखी म्हणजे जन्मजन्मांतरीची जोडीदार हो असे जिला सांगता येईल ती सखी. ज्या सखीच्या सहवासात स्वत:चा विसर पडतो. जगाचा विसर पडतो. आणि मन केव्हाच कल्पनेच्या आकाशात भराऱ्या मारू लागतं अशा मनाला सोबत करणारी ही सखी. सखी एवढी महत्त्वाची का असते कोण जाणे. सखी काय किंवा सखा काय सख्यत्त्वभाव हा जन्माला आलेल्या कुठल्याही माणसासाठी फार महत्त्वाचा असतो. मैत्री हे माणसाच्या जगालाच नव्हे तर प्राण्यांच्या जगाला मिळालेलं हे एक अनमोल वरदान आहे. त्याशिवाय का अनोळखी प्राणीसुद्धा एकमेकांशी खेळत भांडत जुळवून घेतात? ही गरज असते. आणि म्हणून की काय सखीलाच हाक मारावीशी वाटते. आपल्या मनातलं सांगायला आपल्याला सखीच हवी असते. जे आई-वडिलांशी बोलता येत नाही, जे मोठ्या माणसांशी बोलता येत नाही, जे मनाला सलत राहिलेलं असतं ते कोणत्यातरी सखीशीच बोलता येतं. सखी या शब्दासाठी निरनिराळे सुंदर शब्द आहेत. मैत्रीण हा अगदीच ढोबळ शब्द आहे पण सखीसाठी सहचरी, सामिप्या, मालन, मालनिया असे सुंदर सुंदर शब्द आहेत. शास्त्राrय संगीतातल्या कितीतरी चिजा या मालनिया पासून सुरू होतात. छायानटातली ‘मालनिया गूँदे लावो री’ ही अशीच फारच सुंदर चीज आहे. मालनिया किंवा मालन या शब्दाचा अर्थ अतिशय जवळची वाटणारी. जिच्याबद्दल खूप जिव्हाळा वाटतो, जिच्याकडे मनातलं सगळं काही सांगता येतं अशी फारच जवळची सखी. ‘सखी री देखो रोके है कन्हैया ठाडो गली’ ‘सखी येरी आली पिया बिन’, सखि मोरी रुमझुम, ‘सब सखिया समझाये रही’ सखीकडे मनातल्या गोष्टी बोलणाऱ्या, आर्ततेने सखीला साद घालणाऱ्या किंवा आपले अनुभव सखीशी शेअर करणाऱ्या अशा किती म्हणून चिजा सांगाव्यात?

सखी गं मुरली मोहन मोही मना

गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा?

वाचल्यावरच आहाहा असं होतं. आशाताईंच्या कंठातलं मोहिनीअस्त्र होऊन आलेले हे सूर पेलत नाहीत. त्यातल्या प्रत्येक बोलासोबत हृदयाचा एकेक ठोका चुकतो. किती म्हणून सुरेल असावं एखादं गाणं किती म्हणून भारून टाकणारं, मंत्रमुग्ध करणारं असावं? दोन सुरांमधलं अंतर सुद्धा आपल्या जिवाला झेपत नाही. आत्ता पुढचा सूर ऐकायला मिळेल, आत्ता पुढचा सूर ऐकायला मिळेल म्हणता म्हणता जीव अगदी गुदमरतो. त्या सखी शब्दावरच्या ज्या काही हरकती आहेत त्या जीव घेतात. थोडक्यात आशाताईंना त्या प्रत्येक हरकतीमधून कन्हैया कसा आहे हे तर दाखवायचं आहेच. पण आपल्या जिवाला लागलेली कळ किती आहे तेही त्या सखीला सांगायचं असावं. ज्या वेळेला हरकतींमध्ये वैविध्य असतं, त्यावेळेला त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनाही अर्थातच निरनिराळ्या असतात. म्हणजे सखीला सांगण्यासारख्या इतक्या सगळ्या गोष्टी असतात.

म्हणजे ‘सखये प्रेमपत्र पहिले’ पासून ‘सखा

सप्तपदी भव’ पर्यंत बरीच रेंज आहे ही

तसं उत्कटतेने रसरसलेलं एक गाणं म्हणजे,

छत आकाशाचे आपुल्या घराला सखये

तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला

या शापित आयुष्याला.

‘कधीतरी कुठेतरी’ या संगीत नाटकातलं सतत आकाशाकडेच झेप घेणारं हे गाणं. या गाण्यातील आकाशाचे या शब्दावर जी सणसणीत कडाकेदार बोलतान आहे, त्या तानेचा प्रवास हा खरोखरच विजेसारखा आहे. सर्वस्व फेकून देण्याची जी भावना असते ती त्या तानेतून सहज प्रतीत होते. पण हे सगळं कुणासाठी? तर त्या सखीसाठी! आकाशाचे छत असलेलं आपलं घरदार अर्थात उघड्या माळरानावर जरी राहायची वेळ आली तरी तुझ्यासाठी ते मी सहज करीन. पण तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्या गाण्यात तो त्या सखीला सांगतो.

साहु कशी विजने प्रियतमे जाऊ नको परदेसी

तुझ्यावाचुनी मोडुन घरटे होइन मी वनवासी

आयुष्यात येणारी व्यक्ती जी सखी होते. मग प्रिय सखी होते. मग जिच्या वाचून राहताच येत नाही अशी सहचरी केव्हा होऊन जाते ते कळतच नाही. त्यावेळची जिवाची जी तगमग असते ती प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला नक्कीच माहीत असेल. की तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही तिच्या शिवायचं आयुष्य म्हणजे वैराण वाळवंट व तिच्यासोबत वाळवंटात जरी राहावं लागलं तरी ते मात्र नंदनवन! सखीच्या सहवासाची करामतच ही असते.

बरं हे सगळं सखीविषयीचं असतं असं नाही. आयुष्यात जिवाचा सखा असणं हेही अर्थातच तितकं महत्त्वाचं असतं व मनातली दु:खं सख्याला पण सांगता येतात. त्याशिवाय का ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ असे शब्द तिच्या ओठी येतात?

हा महाल कसला रान झाडी ही दाट

अंधार रातीचा कुठं दिसंना वाट

कुण्या द्वाडानं घातला घाव

केली कशी करणी!

विचित्र परिस्थितीनं अवचित घडवलेली जी भेट असते त्या भेटीत कधीकधी नवागताला तर कधी कधी अनागतालाही सखा म्हणावं लागतं. कधी कधी अतिशय विचित्र परिस्थितीत घडलेलं हे सख्यत्त्व आयुष्यभर टिकतं. प्रस्तुत गाणं याच विषयावर खरंतर बोलतं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. पण काही वेळा जे सख्यत्त्व समोर येतं, ते फारच विपरीत परिस्थितीत येतं हे मात्र खरं. द्रौपदीने कृष्णाला सखा मानलं होतं. म्हणून आयुष्यातल्या अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये तिने कळवळून कृष्णाला साद घातली. आणि कृष्णानं कधीच तिची ही हाक व्यर्थ जाऊ दिली नाही. त्या त्या वेळेवर तो हजर होत गेला. तिचं आयुष्य सावरून धरत गेला. सख्यत्त्वासाठी काय हवं असतं शेवटी? तर आर्तभावाने घातलेली साद! ही सख्यत्त्व घडवते तीच ती. तशी हाक मारल्याशिवाय आपल्या सख्याला किंवा सखीला कळत नाही. आणि तशी हाक मारली तर सखा किंवा सखी कोणीही असो, कुठेही असो त्याला कळल्याशिवाय राहत नाही. द्रौपदीने आपल्या वस्त्रहरणाच्या कठीण वेळेस

धावत येई सख्या यदुराया

ना तरी महिमा जाइल विलया

जरि शासन मज, लाज तुला ती

ब्रीद राखी निज समयी अशा या

अशी कळवळून घातलेली सादच तिला त्या प्रसंगातून तारून घेऊन गेली. आपल्या हाती सखीचा किंवा सख्याचा हात असणं किंवा आपल्या हाताशी सखा किंवा सखी असणं महत्त्वाचं असतं ते त्यासाठीच. अशाच प्रसंगात सख्यत्त्व म्हणजे काय याची खरी पारख लागत असते. कस लागत असतो. म्हणून सख्यभक्ती करून अर्जुन भौतिक जगातून तरून गेला. इतकं सख्यत्त्वाचं महत्त्व असतं.

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.