Rain Update : साखरी-चिटेघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, प्रगल्पग्रस्तांची झोळी रिकामीच
यावर्षी धरण काठावरील अनेक विद्युत पंप गाळात अडकून पडले होते
पाटण : गेला आठवडाभर सुरू असलेल्या दमदार अवकाळी पावसामुळे संपूर्ण मणदुरे विभागाला वरदायिनी ठरणारा साखरी-चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे केरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील इतर धरणांपैकी साखरी-चिटेघर धरण हे प्रथमच भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून केरा विभागात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे साखरी-चिटेघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी बाहू लागले आहे. आजच्या परिस्थितीत साखरी-चिटेघर धरणात तीन हजार ८९९.२२ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा असून २०४८.६५ उपयुक्त जलसाठा आहे. एक हजार ४४४.३२ सहस्त्र घनमीटर अचल पाणीसाठा असून संचय पातळी ६१२ मीटर आहे.
धरणाची लांबी ३९५ मीटर आहे. साखरी-चिटेघर धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत असल्याने केरा नदीच्या पाणीपातळीत मोठी बाढ झाली आहे. कोयना व मणदुरे विभागात पडणाऱ्या जोरदार अवकाळी पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
गाळ काढणे आवश्यक
दोन वर्षांपूर्वी या विभागात झालेल्या ढगफुटीमुळे धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठला आहे. त्याचा परिणाम पाणी साठवण क्षमतेवर होत आहे. यावर्षी धरण काठावरील अनेक विद्युत पंप गाळात अडकून पडले होते. धरणाची साठवण क्षमता गाळामुळे कमी झाली असून गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणातील गाळ काढण्याची गरज आहे.
धरण तुडुंब, प्रकल्पग्रस्तांची झोळी रिकामीच
सन २००० साली सुरू झालेला साखरी-चिटेघर प्रकल्प २०१० साली पूर्णत्वाकडे गेला. आजतागायत १५ वर्षांपासून परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात शासन व लोकप्रतिनिधींना अपयशच आले आहे. अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात दंग आहेत, तर लोकप्रतिनिधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ आश्वासनांचे पाणी पाजत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.