साईराम, विल्सन सिंग यांना डायव्हिंगचे ऐतिहासिक कांस्यपदक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
11 व्या आशियाई जलतरण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या इंदिवर साईराम आणि विल्सन सिंग निंगथौजम यांनी पुऊषांच्या 10 मीटर सिंक्रोनाइझ्ड डायव्हिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या प्रतिष्ठित स्पर्धेच्या मागील आवृत्त्यांमध्ये भारतीय डायव्हर्सना कधीही पदक जिंकता आले नव्हते आणि येथील कामगिरीमुळे पुढील वर्षी जपानमधील नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने त्यांच्या दावेदारीत मोठी भर पडली आहे.
मणिपूरचा 18 वर्षीय साईराम आणि 32 वर्षीय विल्सन सिंग हे दोघेही पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे सराव करतात. त्यांनी उत्कृष्ट 300.66 गुणांसह कांस्यपदक जिंकले. त्यांनी चीनच्या झांग्यू कुई, झानहोंग झू (381.75) आणि मलेशियाच्या बर्ट्रांड रोडिक्ट लिसेस, एनरिक एम. हॅरोल्ड (329.73) यांच्या मागे स्थान मिळवले.
पोहण्यात तब्बल 12 भारतीय जलतरणपटूंनी आपापल्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दोन रिले संघांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. तथापि, फक्त 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये कुशाग्र रावतने कांस्यपदक जिंकले. त्याने 15:30.88 वेळ नोंदवली, तर व्हिएतनामच्या हुई होआंग गुयेनने 15:15.01 वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले आणि उझबेकिस्तानच्या इल्या सिबिर्त्सेव्हने 15:23.35 वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले.