For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराजचे विक्रमी सोनेरी यश ; तनुजालाही सुवर्ण!

06:14 AM May 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
साईराजचे विक्रमी सोनेरी यश   तनुजालाही सुवर्ण
Advertisement

खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके : कुस्तीत महाराष्ट्राची तीन पदके निश्चित

Advertisement

वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)

मनमाडचा साईराज परदेशी याने 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये नव्या स्पर्धा विक्रमासह सोनेरी यशाला गवसणी घातली. कराडच्या तनुजा साळुंखे हिनेही वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. 12 वीच्या परिक्षेमुळे सरावाला काही दिवस ब्रेक दिल्यामुळे तिला नव्या विक्रमाला गवसणी घालता आली नाही.

Advertisement

राजगीर क्रीडा विद्यापीठाच्या परिसरात सुरु असलेल्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. गतस्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या साईराज परदेशी याने 81 किलो गटात निर्विवाद वर्चस्व गाजविले. खेलो इंडिया स्पर्धेत माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे, हे दाखवून दिले. त्याने स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात विक्रमी 140 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये त्याने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक 172 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नाची गरजही न वाटलेल्या साईराजने एकूण 312 वजनाची कामगिरी करत नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. रौप्यपदक विजेत्या आंध्र प्रदेशच्या एम तरूणला (स्नॅचमध्ये 126, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 161 किलो) एकूण 287 वजनाची कामगिरी करता आली. उत्तर प्रदेशच्या आयुष राणाने (स्नॅचमध्ये 119 किलो, तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 145 किलो) एकूण 264 किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले.

विक्रमवीर साईराज

नुकताच बारावी पास झालेल्या साईराज परदेशीने 81 किलो गटात नव्या विक्रमासह सुवर्णयश मिळविताना स्वत:चाच विक्रम मोडला. त्याने स्नॅचमधील स्वत:चाच 139 किलोचा विक्रम 140 किलो वजन उचलून मोडीत काढला. हीच कमाल त्याने क्लिन अॅण्ड जर्कमध्येही केली. त्याने या प्रकारातही स्वत:चा 171 किलो वजनाचा विक्रम मोडीत काढताना 172 किलो वजन उचलले. त्यामुळे अर्थातच त्याचा एकूण 312 किलो वजन उचलण्याचाही नवा विक्रम प्रस्थापित झाला. प्रविण व्यवहारे, डी. डी. शर्मा, अलोकेश बर्वा यांचे साईराजला मार्गदर्शन लाभलेले आहे.

मुलींच्या विभागात दिल्लीतील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या तनुजा पोळकडून महाराष्ट्राला खेलो इंडियातही सुवर्णपदकाचीच आशा होती. अपेक्षेप्रमाणे तिने सुवर्णयश मिळविले, पण तिला आपल्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचता आले नाही. तनुजाने स्नॅचमध्ये 68 किलोच्या पहिल्या प्रयत्नात फाऊल केले. मग दुसऱ्या प्रयत्नात हे वजन उचलून तिने तिसऱ्या प्रयत्नात 71 किलो वजन उचलले. क्लिन अॅण्ड जर्कमध्ये तनुजाने दुसऱ्या प्रयत्नात 100 किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने चूरशीच्या लढतीत एकूण 171 किलो वजन उचलून अवघ्या एक किलो अधिक वजनाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. आंध्र प्रदेशच्या थरांगिणी कारंगी हिने रौप्यपदक जिंकले. आसामची भावना गोगोई हिने कांस्यपदक मिळविले.

महाराष्ट्राचा महिला बास्केटबॉल संघ उपांत्य फेरीत

पाटना : महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघाने सलग दोन सामने जिंकून 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाटीलपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा 72-59 गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने यजमान बिहार संघाचा 103 गुणांनी धुव्वा उडवत 118 विरुद्ध 15 असा विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून तनवी जाधव 19 गुण, रेवा कुलकर्णी 18 गुण, साईशा भगत 18 गुण, वेदिका सिंग 17 गुण यांनी मोलाची कामगिरी बजावली. उद्या महाराष्ट्राचा संघ पंजाब विरुद्ध आपल्या गटातील अंतिम सामना खेळेल.

कुस्तीत महाराष्ट्राची तीन पदके निश्चित

प्रणव घारे, सुरज चोरगे, परम माळी अंतिम फेरीत

पाटना : प्रणव घारे, सुरज चोरगे व परम माळी या मराठमोळ्या मल्लांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मैदान गाजवित अंतिम फेरीत धडक मारली आहे. कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्राची 3 पदके पक्की झाली असून आता फक्त पदकाचा रंग कोणता हे उद्या मंगळवारी ठरेल.

पाटनामधील ज्ञानभवन सांस्कृतीक हॉलमध्ये सुरु असणाऱ्या कुस्ती आखाड्यात मराठी मल्लांनी वर्चस्व गाजवले. मुलांच्या विभागात 51 किलो गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारात राधानगरीच्या प्रणव घारे याने चुरशीच्या उपांत्य लढतीत हरयाणाच्या हर्ष कुमारचा 6-4 गुण फरकाने पाडाव करीत अंतिम फेरी गाठली.

92 किलो फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या सुरज चोरगे याने दिल्लीच्या मिराज सिंग झोकेर याला साडेतीन मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्य लढतीत 12.0 गुणांनी लोळविले. ग्रीको रोमन प्रकारातील 80 किलो गटात परम माळी याने उपांत्य लढतीत मध्य प्रदेशच्या सिद्धार्थ जोशीचा 11-4 गुण फरकाने अवघ्या तीन मिनिटांत फडशा पाडत सुवर्णपदकाची लढत निश्चित केली.

मुलींच्या विभागातील 61 किलो फ्रीस्टाईल प्रकाराच्या उपांत्य लढतीत अकोल्याच्या शृष्टी श्रीनाथ हिला पंजाबच्या विशाखाकडून 0-4 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे तिला आता कांस्यपदकासाठी लढावे लागेल. याचबरोबर रिपॅचेसमधून ग्रीको रोमनच्या 55 किलो गटातून आदित्य तापे व 51 किलो गटात हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्राला कांस्यपदके जिंकून देण्यासाठी खेळताना दिसतील.

Advertisement
Tags :

.