For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज वॉरियर्स संघाची अंतिम फेरीत धडक

10:18 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
साईराज वॉरियर्स संघाची अंतिम फेरीत धडक
Advertisement

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक  टी-20 क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर सामन्यात बलाढ्या साईराज वॉरियर्स संघाने सांघिक खेळाच्या जोरावर पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा 6 गड्यांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पराभव स्वीकारूनही पोतदार संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखीन एक संधी दुसऱ्या क्वॉलिफायरद्वारे मिळणार आहे. युनियन जिमखाना पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात पोतदार सीसीआय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद केवळ 127 धावा जमवल्या. त्यात कर्णधार अंगदराज हितलमणीने 24, अमित यादवने 1 षटकार 2 चौकारांसह 19, रुद्रगौडा पाटील व स्वयम आप्पण्णवर यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे कर्णधार ओमकार वेर्णेकर व अनुभवी नंदकुमार मलतवाडकर यांनी प्रत्येकी 3 तर रब्बानी दफेदार व संतोष सुळगे-पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना  128 धावांचे माफक आव्हान  घेऊन फलंदाजीत उतरलेल्या साईराज वॉरियर्स संघाने 18.4 षटकात 4 बाद 128 धावा करून अंतिम फेरीत प्रवेश केला. झीशानअली सय्यदने 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 45, केदारनाथ उसूलकरने 2 चौकार, 1 षटकारासह 33, रोशन जवळी व संतोष सुळगे-पाटील यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. पोतदार रॉयल सीसीआयतर्फे स्वयम आप्पण्णवर व अर्जुन पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे सुभाष हळदणकर, समीर येळ्ळूरकर व निशील पोतदार यांच्या हस्ते सामनावीर झीशानअली सय्यद व इम्पॅक्ट खेळाडू केदारनाथ उसुलकर यांना चषक प्रदान करण्यात आला.

भाटे वॉरियर्स संघाचा विजय

Advertisement

युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत भाटे वॉरियर्स संघाने शानदार विजय मिळवला तर केआर शेट्टी किंग्ज संघ मैदानात न उतरल्याने प्रतिस्पर्धी रोहन ट्रेडर्स बीएससी संघाला विजयी घोषित करून 2 गुण देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानात भाटे वॉरियर्स संघाने साईराज वॉरियर्स संघाचा 6 गड्यांनी पराभव केला. साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 133 धावा केल्या. त्यात संतोष सुळगे-पाटील 7 चौकार, 1 षटकारांसह 56, केदारनाथ उसुलकरने 26 धावा केल्या. भाटेतर्फे भरत गडेकरने 2 तर ऋतुराज भाटे, ध्रुव देसाई व वैष्णव संगमित्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स संघाने 10.5 षटकात 4 गडी बाद 134 धावा केल्या. त्यात माझीद मकानदारने 38 चेंडूत 13 चौकार, 4 षटकारांसह 93 धावा केल्या. त्याला रोहित पाटीलने 20 तर अमेय भातकांडेने 17 धावा केल्या. साईराजतर्फे ओमकार वेर्णेकरने 1 गडी बाद केला. सामनावीर माझीद मकानदार व इम्पॅक्ट खेळाडू संतोष सुळगे-पाटील यांना प्रमुख पाहुणे कमलेश गुंजाळ, राजशेखर यादव यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.

Advertisement
Tags :

.