संतांनी मानवता धर्म दाखवून दिला
कडोली येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत डॉ. अच्युत माने यांनी गुंफले पहिले पुष्प
► वार्ताहर/कडोली
अहिंसेच्या मार्गाने जाऊन मानवता धर्म कसा पाळला पाहिजे. माणसाचं जगणं कसं समाधानाचं होईल यासाठी संतांनी फार मोठे कार्य केले आहे. मानवता धर्म संतांनी दाखवून दिला आहे, असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी काढले.
कडोली मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत पाहिले पुष्प गुंफताना डॉ. अच्युत माने बोलत होते. अध्यक्षस्थानी कडोली मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष शिवाजी कुट्रे होते.
डॉ. माने पुढे म्हणाले, विठ्ठल हा श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे प्रतिक असून या प्रेरणेतून संतांनी दाखवून समाजाला एकप्रकारचे ऑक्सीजन दिलं. दु:खाचा विचार न करता त्याला सामोरे कसं जाता येईल यांचा विचार करावा. आपल्यावरील संकटे दूर होण्यासाठी अदृश्य व्यक्तींचा आधार असतो. आपल्या जवळच असतात आणि आपल्याला आधार दिले असतात. ज्ञानेश्वरांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण लहान असलेल्या मुक्ताईने ज्ञानेश्वरांना आधार दिला. म्हणून खंबीरपणे समाजात राहून ज्ञानेश्वरांनी जगाला जगण्याची वाट दाखवून दिली. संतांनी कष्टाला आणि श्रमाला महत्त्व दिले म्हणून विठ्ठलसुद्धा कळत नकळत त्यांच्या कष्टाला हातभार लावत होता. संतांनी समाजात फार मोठे योगदान दिले आहे. हीच परंपरा आजतागायत संत महत्म्यांनी चालु ठेवली आहे.
स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची हे पहिले वर्ष असून दरवर्षी या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनाचे कार्य चालु ठेवणार असल्याचे संघाचे कार्यकर्ते बसवंत शहापूरकर यांनी प्रस्ताविकमध्ये सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून मोतीराम कांबळे, ग्रा.पं.सदस्य राजू कुट्रे उपस्थित होते. संघाचे कार्यकर्ते सुधीर कुट्रे यांनी सूत्रसंचालन केले.