संतांनी मराठी भाषा पुढे आणली
प्रा. संदीप मुंगारे यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालयातर्फे अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताह कार्यक्रम
बेळगाव : नव्या लेखकांनी मराठी भाषा वृद्धिंगत केली पाहिजे. प्रत्येकाने साहित्य व भाषा जपण्यासाठी कादंबरी, कथा व इतर पुस्तके वाचली पाहिजेत. अनेक संत, कवि व लेखकांनी मराठी भाषा व साहित्य टिकवून ठेवले. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची कौतुके सांगितली असून संतांनी आपली मराठी भाषा पुढे आणली. साहित्य हे अलंकार असून मराठी भाषा ही अभिजात आहे, असे प्रतिपादन प्रा. संदीप मुंगारे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने अभिजात मराठी भाषा गौरव दिन व अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यापीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, प्रा. विनोद गायकवाड, सुनीता मोहिते उपस्थित होते. मुंगारे म्हणाले, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, संत तुकाराम यांनी भाषेची सेवा केली. बा. भ. बोरकर, साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीतांनी क्रांती घडविली. यातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा निर्माण झाला. त्यानंतर मराठी भाषा कशी विकसित झाली याचा त्यांनी आढावा घेतला.
ते म्हणाले, संतांनीच खरी मराठी संस्कृती जोपासली आहे. आपल्या आंतरमनात कायम आपली भाषा व साहित्य असले पाहिजे. आजकाल बोली भाषेतही अनेक भाषांचा वापर होत असल्याने भाषा लोप पावत चालली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक वर्गामध्ये साहित्य पोहोचविणे गरजेचे असून वयोवृद्धांना आपले साहित्य समजून सांगितले पाहिजे. अनेक संत, लेखक, कवि आदींनी भाषा व साहित्य टिकवून ठेवले असून त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
ज्ञानेश्वरांपासून ते एकनाथ महाराजांपर्यंत अनेक संतांनी आपली संस्कृती टिकविण्यात व लोकांपर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अनेक कवि, लेखक, साहित्यिकांनीही भाषा व साहित्य जपण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. कविता, कथा, कादंबरीच्या माध्यमातून भाषा व साहित्य पुढे आणून ती टिकवून ठेवली. मात्र आजकाल याचा सर्वांना विसर पडला असून प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतत चालला आहे. यामुळे आता भाषा व साहित्य टिकविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विलास बेळगावकर, अभय याळगी, आय. जी. मुचंडी, प्रा. सविता गुरव, विठ्ठल कडगावकर यांच्यासह रसिक उपस्थित होते. नेताजी जाधव यांनी आभार मानले.