Vari Pandharichi 2025: पहिला विसावा, ऐक्याचा सांगावा, संत तुकोबाराय अन् सुफी संत अनगडशहा बाबा यांच्यातील मैत्र!
संत तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा यांच्यात मैत्री होती
By : अर्चना माने-भारती
पुणे : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुऊवारी देहूतून मार्गस्थ होणार असून, परंपरेप्रमाणे पालखीचा पहिला विसावा देहूच्या वेशीवरील हजरत सय्यद अनगडशहा बाबा दर्गा येथे असणार आहे. संत तुकोबाराय आणि सुफी संत अनगडशहा बाबा यांच्यातील मैत्र अन् हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सांगावा असलेल्या या विसाव्याचे आता वारकऱ्यांना वेध लागले आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतन प्रस्थान झाल्यानंतर त्याच दिवशी इनामदारवाड्यात पालखीचा मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी आकुर्डी मुक्कामी मार्गस्थ होत असताना पालखी पहिला विसावा घेते, ती अनगडशहा बाबा दर्गा येथे. संत तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा यांच्यात मैत्री होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या मनात या दर्ग्याविषयी फार आदराचे स्थान आहे.
सोहळा विसाव्याच्या ठिकाणी दाखल झाला, की प्रथम पालखी खांद्यावर घेऊन येथे आणली जाते. त्यानंतर अभंग आरती होते. हिंदू व मुस्लिम भाविक मोठ्या भक्तिभावात या ठिकाणी लीन होतात. त्यानंतर पालखी पुढे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होते. पूर्वापार अशी परंपरा असल्याचे अनगड शहा बाबा दर्ग्याच्या सेवेकऱ्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज आणि अगगडशहा बाबा यांच्यात वेगळे नाते होते. तुकोबांची कीर्ती ऐकून अनगडशहा बाबा देहूला त्यांच्या भेटीला आले. पुढे त्यांच्यात मैत्र निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. देहू गावाच्या वेशीजवळच बाबांचा दर्गा आहे. तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा येथेच असल्याने वारकरी संप्रदायात या स्थानाला अतिशय महत्त्व आहे. तुकोबांचे भजन, बाबांची कवणे गात या ठिकाणी त्यांच्या मैत्रीला उजाळा दिला जातो.
जातीभेद विसरून हिंदू-मुस्लिम भाविक, वारकरी येथे भक्तिभावात तल्लीन होऊन भजन, कीर्तनांत रंगून जातात. अल्ला देवे अल्ला दिलावे । किंवा अल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ।। हे शब्द खुद्द तुकोबांचे आहेत. अनगडशाह बाबांचा दर्गा भवानी पेठतदेखील आहे. देहू येथे दरवषी अक्षय तृतीयेला हजरत अन्गढ शाह बाबा यांचा उरूस भरतो. मात्र, येथे बळी मात्र दिला जात नाही.
तुकोबांनी बाबांना माळ घातल्याने पशुबली दिला जात नाही. गोडाचा नैवेद्य येथे दाखविला जातो. या उऊसात सर्व धर्मिय भाविक सहभागी होतात. वारी जेव्हा पुण्यात येते, तेव्हा वारकरी भवानी पेठेतील दर्ग्यालादेखील भेट देतात. वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा आहे. तुकोबा आणि अनगडशहा बाबा यांच्यातील मैत्रभाव हेच सांगतो.